भोकरदनचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार संतोष दानवेंचे निर्देश

विरेगाव येथील पंपिंग स्टेशनची पाहणी; वीजपुरवठ्यातील अडथळे दूर करून योजना तातडीने सुरू करण्याचे आदेश

Jalna Nayak    19-Oct-2026
Total Views |

आमदार संतोष पाटील दानवे  
 
भोकरदन -भोकरदन शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार संतोष पाटील दानवे यांनी खडकपूर्णा प्रकल्पावर आधारित सिल्लोड-भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या विरेगाव येथील संप (पंपिंग स्टेशन) येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या योजनेतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी महावितरण आणि नगरपरिषद प्रशासनाला दिले.
या पाहणीदरम्यान आमदार दानवे यांनी पंपिंग स्टेशनवरील वीजजोडणी, विद्युत मोटारपंप तसेच इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. खडकपूर्णा प्रकल्पातून भोकरदन शहराला अखंडित आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी वीजपुरवठ्यातील अडथळे व अन्य तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, तसेच ही योजना युद्धपातळीवर कार्यान्वित करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.या पाहणीप्रसंगी भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्यासह सुरेश शर्मा, दीपक पाटील मोरे, सुमित थारेवाल, रणवीर देशमुख, राजू पा. सहाणे, शमीम मिर्झा, रामदास पाथरे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.