बावनकुळेंचा मॅरेथॉन दौरा; शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार?

वरुडी ते दगडवाडी पीक पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद, पंचनाम्यांचे आदेश, मात्र मदतीच्या अंमलबजावणीवर आता नजर

Jalna Nayak    02-Oct-2026
Total Views |
 
जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत महसूल मंत्र्यांनी पंचनामे आणि मदतीचे आश्वासन दिले.
 
जालना - अपेक्षेपेक्षा कमी पाऊस आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील खरीप पिके अडचणीत आली असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यात मॅरेथॉन दौरा करीत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. बदनापूर तालुक्यातील वरुडी आणि भोकरदन तालुक्यातील दगडवाडी शिवारात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थितीची माहिती घेतली.मात्र या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात नेमके काय पडणार, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे.
पीक पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पावसाचा खंड आणि निर्माण झालेल्या अडचणी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी बावनकुळे यांनी राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पंचनामे किती दिवसांत पूर्ण होतात, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत कधी जमा होते आणि प्रत्यक्ष किती नुकसानभरपाई मिळते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
नागरिकांचीही गाऱ्हाणी ऐकली
 
नागरिकांचीही गाऱ्हाणी ऐकली
दौऱ्यादरम्यान महसूल मंत्र्यांनी जालना येथील विश्रामगृहात नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या ऐकून निवेदने स्वीकारली. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या दौऱ्यात आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, बदनापूर उपविभागीय अधिकारी लता बागुल, भोकरदन उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिक पाणिग्रही, जिल्हा अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
दौरा झाला अंमलबजावणीची कसोटी
मंत्र्यांच्या पाहणीमुळे प्रशासनाला पीक नुकसानीच्या गांभीर्याची प्रत्यक्ष माहिती मिळाली आणि पंचनाम्यांना गती देण्याचे निर्देश मिळाले, हे या दौऱ्याचे तातडीचे फलित मानले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष मदत किती आणि किती लवकर मिळते, यावर या दौऱ्याचे खरे फलित ठरणार आहे.
आता प्रशासनाने पंचनामे, नुकसानाचे मूल्यांकन आणि मदतीची प्रक्रिया किती पारदर्शक व वेगाने पूर्ण केली, याचा जालना जिल्ह्यातील शेतकरी बारकाईने आढावा घेणार आहेत.