५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान जालना शहराचापाणीपुरवठा राहणार बंद

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी

Jalna Nayak    02-Oct-2026
Total Views |
 
जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी
 
जालना- जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण व अंबड येथील पंपिंग स्टेशनमधील जुने पंप काढून त्याऐवजी नवीन पंप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर काम सुरक्षितरित्या व तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित पंपिंग स्टेशनचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.तसेच, नवीन ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी ९०० मि.मी. व्यासाची शुद्ध पाण्याची वाहिनी जुन्या पंपिंग स्टेशनच्या ९०० मि.मी. व्यासाच्या विद्यमान पाणीपुरवठा वाहिनीला जोडण्याचे कामही करण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित पाणीपुरवठा वाहिनीचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. उपरोक्त सर्व कामे एकाच कालावधीत पूर्ण करून पाणीपुरवठा यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत सलग शटडाऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे सदर कालावधीत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. जालना शहरातील सर्व नागरिकांनी सदर शटडाऊन कालावधी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.