‘गृहिणी’प्रमाणे आता ‘घर सांभाळणारा नवरा’ काळाची गरज! - ॲड. अश्विनी धन्नावत

कुटुंब सांभाळणे (होममेकर) हा शब्द केवळ स्त्रीपुरताच मर्यादित नाही, तो लिंगनिरपेक्ष आहे

Jalna Nayak    21-Oct-2026
Total Views |

ॲड. अश्विनी धन्नावत
 
संसाराचा गाडा ओढताना वर्षानुवर्षे एकाच चाकावर भार टाकणाऱ्या समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारे अत्यंत संवेदनशील आणि तितकेच परखड निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आज बदलत्या युगात शिक्षण आणि करिअरच्या शिखरावर पोहोचणाऱ्या महत्त्वाकांक्षी महिलांसाठी लग्न हा एक तडजोडीचा किंवा एकांगी निर्णय ठरत चालला असून, विवाह त्यांच्या स्वप्नांमधील अडथळा ठरू लागल्याचे वास्तव समोर येत आहे. अशा काळात, “ज्याप्रमाणे कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी ‘गृहिणी’ असते, त्याचप्रमाणे आता पुरुषांनीही संसार आणि मुलांसाठी ‘घर सांभाळणारा नवरा’ (हाउस हसबंड) का होऊ नये? हेच आता समाजाचे ‘न्यू नॉर्मल’ झाले पाहिजे,” अशा शब्दांत न्यायालयाने पुरुषप्रधान मानसिकतेवर बोट ठेवले आहे.
एका डॉक्टर पती आणि त्याच्या उच्चशिक्षित पत्नीच्या घटस्फोटाच्या याचिकेवर न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती एम. डी. सुमती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. २०११ मध्ये रेशीमगाठ बांधलेल्या या संसारात पतीने आपल्या उच्च शिक्षणाची आणि करिअरची स्वप्ने पूर्ण करावीत म्हणून पत्नीने माहेरी राहून दोन लहान मुलांना मायेने वाढवले, संसाराचा गाभा जपला. मात्र, पतीच्या करिअरला पंख फुटताच त्याच्यातील पुरुषी अहंकार जागा झाला आणि ज्या साथीदाराने त्याच्या यशासाठी स्वतःच्या अस्तित्वाची आहुती दिली, तिच्याच त्यागाची त्याला विस्मृती पडली. पतीच्या कौशल्यांना धार येत असताना, घराच्या चार भिंतींत रमलेल्या पत्नीचे कर्तृत्व मात्र धूसर झाले होते. शेवटी हे नाते पुनरुज्जीवित होण्याच्या पलीकडे पोहोचल्याचे पाहून न्यायालयाने पतीला पत्नी आणि मुलांसाठी २.५ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्याचे आदेश देत अखेर विवाहाची गाठ सोडवली.
न्यायालयाने नमूद केले की, कुटुंब सांभाळणे (होममेकर) हा शब्द केवळ स्त्रीपुरताच मर्यादित नाही, तो लिंगनिरपेक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गृहिणीच्या कष्टांचे अमूल्य आर्थिक आणि भावनिक मोल मान्य केले आहे. त्यामुळे करिअर आणि संसाराच्या ओढताणीत जर पुरुषानेही घर सांभाळण्याची जबाबदारी उचलली, तर अनेक संसार विस्कटण्यापासून वाचू शकतील.
महाराष्ट्रातील चित्रही काही वेगळे नाही...
न्यायालयाचे हे ताशेरे केवळ त्या एका खटल्यापुरते मर्यादित नसून, महाराष्ट्रातील शहराशहरांत आज नेमके हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक आणि आयटी हबमध्ये आज हजारो उच्चशिक्षित तरुणी करिअरच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. मात्र, लग्न झाल्यावर ‘करिअरही तूच सांभाळ आणि चूल-मूलही तुझेच’ या दुहेरी ओझ्याखाली अनेक महिलांचे मानसिक व भावनिक खच्चीकरण होत आहे. परिणामी, कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या घटस्फोटांच्या अर्जांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अनेक तरुणी तर विवाहाची चौकटच नाकारताना दिसत आहेत. संसाराचा भार दोघांचा असताना, एकट्या स्त्रीनेच स्वप्नांची राख का करायची? हा विदारक प्रश्न आज महाराष्ट्रातील घराघरांत घुमतो आहे.
“घर सांभाळणे दुय्यम नाही, अहंकारापेक्षा नाते मोठे हवे!” – ॲड. अश्विनी धन्नावत
या संवेदनशील विषयावर भाष्य करताना ॲड. अश्विनी धन्नावत म्हणाल्या की, “मद्रास उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण म्हणजे भारतीय कुटुंबव्यवस्थेतील पारंपरिक पुरुषी मानसिकतेला दिलेली एक अत्यंत गरजेची चपराक आहे. संसार ही तडजोड नसून एक सुंदर भागीदारी आहे. आज महाराष्ट्रातही आयटी, कॉर्पोरेट किंवा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो भगिनी केवळ कौटुंबिक असमतोलामुळे वैवाहिक आयुष्यात घुसमटत आहेत. जर स्त्री खांद्याला खांदा लावून आर्थिक भार पेलू शकते, तर पुरुषाने घर आणि मुलांची काळजी घेण्यात कसला कमीपणा? ‘होममेकर’ असणे हे त्यागाचे आणि आदराचे प्रतीक आहे. पुरुषांनी जर आपला अहंकार बाजूला ठेवून ही भूमिका आनंदाने स्वीकारली, तर केवळ घटस्फोटांचे प्रमाणच घटणार नाही, तर निखळ प्रेमावर आधारलेली घरे पुन्हा उभी राहू शकतील.”