जालना शहरातील पावभाजी केंद्रांची संयुक्त तपासणी करा

पावभाजी केंद्रांमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन

Jalna Nayak    23-Oct-2026
Total Views |
 
अन्न सुरक्षेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन
 
 
जालना: जालना शहरातील लहान-मोठ्या पावभाजी केंद्रांमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि जालना महानगरपालिकेने संयुक्त पथकाद्वारे शहरातील सर्व पावभाजी केंद्रांची तातडीने झाडाझडती घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सीताराम चोखाजी तुपे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एफडीएचे सहायक आयुक्त आणि मनपा आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.
नुकतीच अन्न व औषध प्रशासनाने शहरातील नामांकित 'डॉमिनोज पिझ्झा' सेंटरवर कारवाई करून ते बंद केले होते. या कारवाईचे स्वागत करत तुपे यांनी प्रशासनाचे आभार मानले. मात्र, याच धर्तीवर गल्लोगल्ली आणि रस्त्यांवर चालणाऱ्या पावभाजी केंद्रांचीही तपासणी होणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
अस्वच्छता, निकृष्ट दर्जा आणि अतिक्रमाणाचा फटका
शहरातील विविध भागात सायंकाळी पावभाजी केंद्रांवर नागरिक, महिला आणि लहान मुलांची मोठी गर्दी असते. मात्र, बहुतांश केंद्रांवर अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जातात. निकृष्ट दर्जाचे तेल, दूषित पाणी आणि अस्वच्छ कच्च्या मालामुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, अनेक चालकांनी मुख्य रस्ते आणि पदपथांवर बेकायदेशीर टेबल-खुर्च्या व हातगाड्या मांडून अतिक्रमण केले आहे. यामुळे सायंकाळच्या वेळी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन पादचाऱ्यांना चालणे मुश्कील होत आहे.
 
"केवळ मोठ्या ब्रँडवर कारवाई करून चालणार नाही. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार प्रत्येकाने स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत." - सीताराम चोखाजी तुपे