शरदाच्या रात्रीला आकाशाच्या निळ्या मखमलीवर कोजागिरीचाचंद्र नक्षीकाम करूनसौंदर्याचा साज चढवितानाचांदण्यांच्या कुंचल्यातून पृथ्वीच्या कपाळावर शांततेची चंद्रकोर रेखाटतो. याचंद्रप्रकाशाच्या अमृतधारांनी न्हाऊन निघालेली धरतीसुद्धादवबिंदूच्या मोत्यांनी सजलेल्या हिरवळीने मंद झुलणाऱ्या पानांची वीण पांघरते. अशावेळी कोजागिरी केवळ पंचांगातील तिथी राहत नाही; तरती माणसाच्या संवेदनशीलतेलानिसर्गाने हळुवारसाद घातलेलीअसते.मात्रहेसगळं पाहताना आकाशात कोजागिरीचाचंद्र पूर्ण तेजाने तळपत असताना माणसाच्या अंतःकरणातीलमूल्यांचाअंधार मात्र अमावस्येच्या चंद्रासारखा गडद होत असतो? हाप्रश्नमनालासततअस्वस्थ करीतराहतो.
प्रचलित धार्मिक समजुतीनुसारकोजागिरीला रात्री जागरण करणाऱ्यावर लक्ष्मीची कृपा होते. म्हणून‘को जागर्ति?’ कोण जागे आहे? असा प्रश्न या पौर्णिमेच्या नावाशी जोडून पुढे येतो. काही परंपरामध्ये लक्ष्मीपूजन, प्रार्थना, नामस्मरण आणि दूग्धपानाला विशेष महत्त्व आहे. आपल्याकडेचंद्रप्रकाशात दूध पिण्याची मोठीपरंपरा आहे. लक्ष्मीच्या आगमनाची अपेक्षा, जागरणाची श्रद्धा, आप्तस्वकीयांच्या सहवासाचा आनंद आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वादातच कोजागिरीचे खरे सांस्कृतिक वैभव सामावलेले आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर देताना आपण नेमके कोणत्या जागृतीचा उत्सव साजरा करतो, ही खरी विचार करण्याची बाब आहे.
डोळ्यांवर झोपेचा पहारा ठेवणे म्हणजे जागरण नव्हे; तर अन्यायाच्या अंधारात विवेकाची मशाल तेवत ठेवणे म्हणजे खरे जागरण होय. रात्रभर चंद्रदर्शन घेणे म्हणजे जागृती नव्हे; तर डोळ्यांसमोर घडणाऱ्या शोषणाला, विषमतेला आणि मूल्यांच्या ऱ्हासाला निर्भयपणे सामोरे जाणे, हीच खरी जागृती आहे. माणसाच्या विवेकावर अज्ञानाची धूळ साचली असेल आणि संवेदनांच्या खिडक्यांना स्वार्थाचे पडदे लावले असतील, तर चंद्राच्या हजारो किरणांनी अशा मनात प्रकाश कसा पाडावा? दुर्दैवानेआपण विधींच्या झगमगाटात इतके रममाण झालो आहोत की, श्रद्धेच्या गाभाऱ्यात मूल्यांची समई कधी विझलीययाचे भानही आपल्याला राहिलेले नाही.
कोजागिरी म्हटली की दुधाची आठवण अपरिहार्य आहे. दूध उकळते, त्यात साखर विरघळते, वेलचीचा सुगंध दरवळतो आणि चंद्रकिरणाच्या सहवासात त्याला अमृताचे प्रतीकात्मक रूप प्राप्त होते. एकाच पेल्यातून हेदूध वाटून घेताना आपलेपणाचा ओलावा निर्माण होतो. या दुधाच्या एका घोटात घराची ऊब, नात्यांची गोडी आणि एकत्र जगण्याची जाणीव दडलेली असते, ती आपण समजून घेणे आवश्यक आहे.
दुधाच्या शुभ्रतेतून समाजाच्या काळोखाकडे पाहिलेतर काही प्रश्न पेल्याच्या तळाशी साचलेल्या सायीप्रमाणे वर येतात. एखाद्या घरात दुधाचे कारंजे उडत असताना दुसऱ्या घरात पाण्यात भिजवलेली भाकरीही वाट्यालायेत नसेलतर यासमृद्ध सोहळ्याने कोणाचे जीवन उजळणार आहे? एका बाजूला दुधाचे ग्लास सजावटीसाठी ठेवले जात असतानातर दुसऱ्या बाजूला कुपोषणाची आकडेवारी शेअर बाजारातील निर्देशांकासारखी मुसंडी मारीत असेल तरही दुधाची नव्हे, तर संवेदनांची भेसळ आहे!
एकवेळदुधात साखर कमी पडली तर साखर टाकून गोडवा वाढवता येईल; पण माणुसकीतला जो गोडवा संपत चालला आहे तो कोणत्या दुकानात मिळतो का? शिवाय नात्यामधील कटुता, व्यवहारातील फसवणूक आणि समाजातील विषमतेलावेलचीचा सुगंध लावून पवित्र करता येत नाही. चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध कितीही शुभ्र दिसत असले, तरी मनातील मत्सर, लोभ आणि अहंकाराचे डाग त्यात विरघळूनविरून जात नाहीत.या जागरणाचा आणखी एक आधुनिक प्रकार सभोवती बहरत आहे.
डोळे जागे, हात जागे, मोबाईल जागा; फक्त तिथे मन अनुपस्थित असते! कारणशेजारी बसलेल्या माणसाशी दोन शब्द बोलण्यापेक्षा दूरच्या अनोळखी व्यक्तीच्या छायाचित्रावर प्रतिक्रिया देणे आपल्याला हल्ली अधिक महत्त्वाचे झाले आहे. कुटुंब एकत्र बसलेले असतेपण प्रत्येक जण आपल्या स्वतंत्र डिजिटल बेटावर निर्वासित झालेला असतो. चंद्र आकाशात एकटाच असतो; आणि त्याच्या प्रकाशात बसलेली माणसेही आपणहूनभिंती घालून घेतलेल्या तुरुंगात एकाकी झालेली असतात. मगही कसली एकत्रितता? ही तर एकाच छताखाली नांदणारी अनेक एकाकी विस्थापित मने आहेत.
रात्रभर जागूनही दुसऱ्याच्या वेदनेची चाहूल लागत नसेलतर ते जागरण नव्हे;तरनिद्रेचेच एक आधुनिक रूप आहे. खरी जागरूकता म्हणजे अन्याय ओळखणे, विषमता समजून घेणे, पर्यावरणाच्या हाकेला प्रतिसाद देणे आणि नात्यांच्या तुटणाऱ्या धाग्यांना जपण्यात आहे. चंद्राच्या साक्षीने केलेल्या गप्पांना दुसऱ्याच्या अश्रूंची जाणीव असेलतरच त्या गप्पांना संस्कृतीचा अर्थ आणि वैभव प्राप्त होईल.
कोजागिरीलामाणसाने चांगुलपणाचा ढोल वाजवण्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात शांतपणे उजेड,उत्सवाच्या नावाखाली होणारी अन्नाची नासाडी,अनावश्यक खर्चाला आवर,ध्वनिप्रदूषण आणि कचऱ्यापासून परिसरसंरक्षण व संवर्धनकरण्याचा वारसा चंद्राकडून शिकावा. निसर्गाची पूजा म्हणजे त्याच्या प्रतिमेला फुले वाहणे एवढेच नाही; तर त्याच्या अस्तित्वाला धक्का न लावता जगण्याची शिस्त सांभाळणे आहे.
कोजागिरीच्या पदरात जागरूकता, समृद्धी, सहजीवन, निसर्गप्रेम आणि आत्मपरीक्षण ही मूल्ये गुंडाळलेलीआहेत. परंतु परंपरेचा पदर हातात ठेवून तिच्यातील मूल्येच गळून पडलीतर हातीविधीचे केवळ रिकामे आवरणउरते. फुलांचा हार गळ्यात असला म्हणून माणूस सुगंधी होत नाही; त्यासाठी त्याच्या विचारांत माणुसकीचा दरवळ भिनायला हवाय.
कोजागिरीच्या रात्री आपण मुलांना केवळ परंपरा सांगण्याऐवजी त्या परंपरेतील मानवी मूल्ये समजावूनसांगूशकतो. जाती, धर्म, भाषा आणि आर्थिक स्तराच्या भिंती ओलांडून माणसाला माणूस म्हणून स्वीकारू शकतो.अशा कृतीसाठी मोठ्या मंडपाची, महागड्या सजावटीची किंवा प्रसिद्धीच्या झोताची अजिबातचआवश्यकता नाही. यासाठीमनातील संवेदनशीलता आणि कृतीशील विवेक उजळविणे आवश्यक आहे.
माणसाच्या अंतरंगात विवेक नावाचाएक प्रकाशमानचंद्र असतो. त्याच्या शीतलताम्हणजेकरुणा आणि त्यावरील कलंकाचे नाव स्वार्थ, अहंकार व दांभिकता आहे. बाह्य चंद्र दर पौर्णिमेला पूर्णत्वाने उगवतो; पण आतला चंद्र कित्येकदा अमावस्येच्या अंधारात हरवलेला असतो. त्याला उगवण्यासाठी पंचांगाची, कुठल्या शुभमुहूर्ताची किंवापुरोहितांच्या मंत्रोच्चाराची आवश्यकता नसते, तरत्यासाठी स्वतःच्या चुका मान्य करण्याचे धैर्य आणि त्या सुधारण्याची प्रामाणिक तयारी आवश्यकअसते.
कोजागिरीच्या उत्सवातीलकाळोख हा रात्रीच्या अंधाराचा नव्हे, तर मनातील अज्ञानाचा, सामाजिक दांभिकतेचा, विषमतेचा आणि असंवेदनशीलतेचा प्रतीकात्मक अंधार आहे. म्हणूनचंद्रप्रकाशाला दोष देण्यात अर्थ नाही; कारण प्रकाशाचे काम उजळणे, तर अंधाराचे काम झाकणे. प्रश्न इतकाच की आपण उजेडाचा उपयोग सत्य पाहण्यासाठी करतो की आपले दोष गडदपणेदिसू नये म्हणून?
आपण निसर्गाचे सौंदर्य उपभोगतो; पण त्या सौंदर्याचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारतो का? चंद्राला अर्घ्य देणारे हात नदीत कचरा टाकत असतील, पर्यावरणाच्या नावाने भाषणे करणारेच प्रदूषण वाढवत असतीलतर ती श्रद्धा नसून सोयीस्कर दुटप्पीपणा आहे. कारण संस्कृती ही केवळ परंपरांची पालखी नसते; ती मानवी मूल्यांची जबाबदारीही असते.
कोजागिरी पौर्णिमा आनंदाने, उत्साहाने आणि परंपरेच्या सौंदर्याची जाणीव ठेवून साजरी करावी. दूध प्यावे, चांदण्यांचा आनंद घ्यावा, आप्तेष्टांसोबत हसावे, गावे आणि आठवणींच्या आकाशात नवे तारे पेटवावेत. पण या सगळ्यात स्वतःला एक प्रश्न विचारावा की, या उत्सवानंतर आतला माणूस अधिक समृद्ध झाला आहे काय?कोजागिरीच्याजागरणाने माझ्यातल्या विवेकाला जागे केले का?या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतीलतर चंद्रप्रकाशात घालवलेली रात्र कितीही सुंदर असली, तरी तिचा सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ निरर्थक आहे.
चंद्र आकाशात उगवणे ही नैसर्गिकघटना आहे; पण माणसाच्या मनात उजेड पडणे ही संस्कारांची उपलब्धी असते. लक्ष्मीची आरती करणे हा धार्मिक विधी आहे; पण श्रमाचा सन्मान करणे हे मूल्यांचे पूजन आहे. दुधात साखर मिसळणे हा पाककलेचा भाग आहे; पण व्यवहारात गोडवा मिसळणे ही माणुसकीची कला आहे. रात्रभर जागणे ही शारीरिक क्रिया आहे; पण दुसऱ्याच्या वेदनेसाठी जागे होणे ही नैतिक जाणीव आहे.
चला तर या कोजागिरीला चंद्राकडे पाहताना स्वतःच्या अंतःकरणातही डोकावू या. दुधातील चंद्रबिंब सुंदर आहेच; पण एखाद्या भुकेल्याच्या डोळ्यात समाधानाचे प्रतिबिंब त्याहून सुंदर आहे. आकाशातील पौर्णिमा मन मोहून टाकतेच; पण अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या विवेकाची पौर्णिमा समाजाचे भविष्य उजळून टाकते.आकाशातील चंद्राचे दर्शन घेतानाअंतःकरणातील अंधाराचे विसर्जन करू. कारण चंद्रप्रकाशाने रात्र सुंदर होईल, पण मूल्यांच्या प्रकाशाने माणसाचे संपूर्णजीवन सुंदर होईल..!
- डॉ. वासुदेव ऊगले, विभागप्रमुख, मराठी भाषा व वाङ्मय विभाग, श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालय, जालना, vasnt.ugale@gmail.com