देऊळगाव राजा :बाजार समितीच्या जमिनीवरील कथित अनियमिततेची चौकशी सुरू!

अतिक्रमणे, खरेदी-विक्री व्यवहार आणि बांधकामांची होणार तपासणी; कारवाईकडे लक्ष

Jalna Nayak    26-Oct-2026
Total Views |
 
देऊळगाव राजा :बाजार समितीच्या जमिनीवरील कथित अनियमिततेची चौकशी सुरू!
 
देऊळगाव राजा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जमिनीवरील कथित अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहार, अतिक्रमणे आणि बांधकामांप्रकरणी प्रशासकीय चौकशी सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी यासंदर्भात शासन व संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांनी सहायक निबंधक, सहकारी संस्था, सिंदखेड राजा यांना चौकशी अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २४ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर पणन संचालनालय, पुणे यांनी ७ सप्टेंबर रोजी, तर विभागीय सहनिबंधक, अमरावती यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी पुढील कार्यवाहीसंदर्भात पत्रे पाठविली.
बाजार समितीच्या जमिनीवरील व्यवहारांची वैधता, जमीन वाटप व हस्तांतरणासाठी आवश्यक मंजुरी, अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांची स्थिती यांची चौकशी होणे अपेक्षित आहे. तसेच संबंधित व्यवहारांमुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे का, याचीही कागदपत्रांच्या आधारे तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.
चौकशी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष स्थळपाहणी, अभिलेखांची पडताळणी आणि संबंधितांचे म्हणणे नोंदवून निष्पक्षपणे पूर्ण करावी, अशी मागणी तक्रारदार खरात यांनी केली आहे. चौकशीत अनियमितता सिद्ध झाल्यास नियमानुसार कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, चौकशी अहवालात नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.