जालना -सेंट्रल किचन पद्धती रद्द करा, विद्यार्थ्यांना शाळेतच ताजा आहार द्या आणि आमचा रोजगार हिरावून घेऊ नका, अशा जोरदार घोषणा देत शालेय पोषण आहार कामगार महिलांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन केले. तब्बल तासभर सुरू असलेल्या घोषणाबाजीने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला.
सिटू संलग्न शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या या आंदोलनातून सेंट्रल किचन पद्धतीला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. मागण्यांची दखल न घेतल्यास दिवाळीत महामुक्काम आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. जालना जिल्ह्यातील शाळांमध्ये सेंट्रल किचन पद्धतीने पोषण आहार पुरविण्याच्या हालचाली सुरू असल्याने स्थानिक पातळीवर भोजन तयार करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका ठिकाणी तयार केलेले अन्न विविध शाळांमध्ये पोहोचविताना त्याचा ताजेपणा, स्वच्छता आणि वेळेवर वितरण याबाबतही प्रश्न उपस्थित होऊ शकतात, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
सेंट्रल किचन पद्धतीला स्थगिती द्यावी, स्थानिक पातळीवरील स्वयंपाक व्यवस्था कायम ठेवावी, कामगार संघटनांशी चर्चा करावी आणि रोजगार सुरक्षिततेची लेखी हमी द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास दिवाळीत जिल्हा परिषदेसमोर महामुक्काम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला. आंदोलनात मधुकर मोकळे, ॲड. अनिल मिसाळ, शेषराव कान्हेरे, कृष्णा काटकर, युनूस पठाण, चंपाबाई दाभाडे यांच्यासह शेकडो कामगार सहभागी झाले.