अंबड, प्रतिनिधी- अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंगर्डे हदगाव येथे तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. तुकाराम जगन काकडे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात त्याचा लहान भाऊ रामेश्वर जगन काकडे (वय २२) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जगन अश्रुबा काकडे यांच्या शेतातील आखाड्यावर तुकाराम काकडे याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून झाल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे व किरण हावले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मयताच्या नातेवाइकांकडून गोपनीयरीत्या माहिती संकलित केली. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी समोर आली. तुकाराम काकडे हा दारूच्या नशेत आई-वडील व भावाला शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.प्राथमिक तपासानुसार, दि. २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान कुऱ्हाडीने वार करून तुकारामचा खून केल्याच्या प्रकरणात रामेश्वरचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोंदीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे, किरण हावले,बालाजी पदमने, यांच्यासह पोलीस अंमलदार सिद्दीकी, भोजने, भवरे व खरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.