जालना रेल्वे स्टेशन ‘असून अडचण नसून खोळंबा’

गैरसोयी, अस्वच्छता, एजंटांचा सुळसुळाट : जालना रेल्वेचं चाललंय तरी काय?

Jalna Nayak    27-Oct-2026
Total Views |

जालना रेल्वे स्टेशन 
 
जालना : जालना रेल्वे स्टेशन म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ असे म्हणण्याची पाळी सर्वसामान्य जनतेवर येत असल्याचे सध्या चित्र आहे. कारण इथे सुविधांऐवजी गैरसोय, स्वच्छतेऐवजी धूळ, कचरा; आणि सुरक्षेऐवजी धोक्याचे वातावरण झाले आहे. एवढेच नव्हे तर तिकिटांची मारामारी, एजंटांचा सुळसुळाट आदी अनेक समस्या तर नित्याच्या झाल्या आहेत.
पंतप्रधानांनी जुन्या रेल्वेस्थानकांचे पुनर्निर्माणाचे काम हाती घेतले व जालन्याला काही काळ रेल्वेमंत्रीपद दिले, त्यामुळे जालनावासी खरे तर सुखावले होते. राजुरेश्वर मंदिराची प्रतिकृती असलेले अद्ययावत रेल्वेस्टेशन पाहायला मिळणार असल्याचा जालनेकराना आनंदही झाला होता; परंतु आज मात्र अद्ययावत जाऊ द्या, आम्हाला विना धावपळ, सहज तिकीट आणि आरामदायी प्रवास करता येईल का, असा संतप्त सवाल जालनेकर करत आहेत.
जालना रेल्वे स्टेशन अस्वच्छता, गैरव्यवस्थापन आणि असुरक्षिततेचे आगर बनले आहे. कित्येक दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक अक्षरशः कोलमडले आहे. त्याचा फटका वृद्ध, अपंग, महिला व लहान मुलांना बसत आहे. तासन्‌‍‍ तास अस्वच्छ स्टेशनवर गाडी येण्याची वाट पाहत बसावे लागणे ही मोठी शिक्षा आहे. त्यात ऐन वेळी गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची घोषणा होते आणि एकच धावपळ करावी लागते. बोगी क्रमांकाचे डिसप्ले दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे व संक्षिप्त दाक्षिणात्य उद्घोषण ऐकणे गोंधळात अधिक भर घालणारे ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी तर प्रचंड धावाधाव होते. रेल्वे स्टेशनवर कुठेही स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. स्वच्छतागृह स्टेशनच्या बाहेर असल्यामुळे व गाड्यांच्या अनियमित वेळापत्रकामुळे स्वच्छतागृहाचा वापर करण्याचे धाडसच प्रवाशांमध्ये होत नाही, अशा तक्रारी वाढत आहेत.
स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय नावापुरतेच आहे की काय असे वाटते. रिक्षावाले प्लॅटफॉर्मवर येऊन उतरलेल्या प्रवाशांना अक्षरशः गराडा घालतात, बाहेर रिक्षा अशा लावल्या जातात की, बाहेर पडणे अधिकच त्रासदायक होते. रेल्वे आरक्षणासाठी एक स्वयंपूर्ण खिडकी आहे; पण त्यावर कब्जा अनधिकृत एजंटांचा आहे. दुसरी खिडकी ती अनारक्षित व आरक्षित दोन्ही तिकिटांसाठी असूनही फक्त एजंटांनांच आरक्षित तिकिटे राजरोसपणे दिली जातात, अशी ओरड आहे. ह्या सर्व बाबी स्थानिक लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासन, रेल्वे प्रवासी संघटनेला दिसत नाही का, असा प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय आहे. राजुरेश्वराच्या कृपेने प्रवाशांना किमान सुविधा तरी जालना रेल्वे प्रशासन देईल काय? असा सवाल जनता विचारत आहे