‘सच’ ला झूट कोणी ठरविले?

महायुतीतील अंतर्गत धुसफूस, समन्वयाचा अभाव आणि मित्रपक्षांमधील अविश्वासाचा फटका

Jalna Nayak    29-Oct-2026
Total Views |
 
‘सच’ ला झूट कोणी ठरविले?
 
 
निवडणूक विश्लेषण

संजय देशमुख, संपादक, दैनिक जालना नायक
 
औंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विभाग पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या राजकीय भूकंपापेक्षा कमी नाही. गेली १८ वर्षे (सलग तीन टर्म) या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व गाजवणारे सतीश चव्हाण यांचा झालेला पराभव हा केवळ एका उमेदवाराचा पराभव नसून, राजकीय प्रस्थापितांविरोधातील लाटेचे आणि मतदारांच्या सुप्त नाराजीचे उत्तम उदाहरण आहे.सतीश चव्हाण यांच्यासाठी सुरू केलेले ‘सच’ नावाचे ब्रँडिंग केवळ त्यांच्या नावाचे लघुरुप नव्हते, तर त्यांच्या स्वच्छ आणि प्रभावी प्रतिमेचे प्रस्थ निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. परंतु, राजकारणात जमिनीवरील वास्तव आणि लोकांशी असलेला थेट संपर्क जास्त महत्त्वाचा ठरतो. सलग तीन टर्म आमदार राहिल्यानंतरही पदवीधर वर्गात असणारी अलिप्तता, युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज न उठवणे आणि मतदारसंघाशी असलेला तुटलेला संपर्क या ब्रँडिंगमागील वास्तवाला झाकोळू शकला नाही. जनतेने या कृत्रिम ब्रँडिंगला निकालाच्या माध्यमातून छेद दिला.
कोणत्याही लोकप्रतिनिधीबद्दल सलग १८ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर एक नैसर्गिक जनक्षोभ किंवा विरोधी लाट तयार होते. सतीश चव्हाण यांच्या बाबतीतही हेच घडले. मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षकांचे व संस्थाचालकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याची भावना पदवीधर वर्गात होती. मराठवाड्याच्या विकासासाठी आणि पदवीधरांच्या भविष्यासाठी त्यांच्या कार्यकाळात नेमके काय झाले, याबद्दल मतदारांमध्ये असलेला राग या निवडणुकीत प्रभावी ठरला.
या पराभवातील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, सत्तेत असणाऱ्या महायुतीचे मराठवाड्यात सर्वाधिक आमदार असताना आणि संपूर्ण राजकीय यंत्रणा पाठीशी असताना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव होणे. महायुतीमधील घटक पक्षांनी (भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट) मनाने आणि तन-मन-धनाने चव्हाण यांना साथ दिली नाही, हे या निकालावरून स्पष्ट होते. महायुतीतील अंतर्गत धुसफूस, समन्वयाचा अभाव आणि मित्रपक्षांमधील अविश्वासाचा फटका चव्हाण यांना बसला. सत्तेत असूनही घरच्यांचाच पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचा पराभव अधिक अधोरेखित होतो.
याउलट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी कोणतीही मोठी गाजावाजा किंवा नको ती आक्रमकता न दाखवता अतिशय सुनियोजित मोहीम राबवली. सतीश चव्हाण यांच्याविरोधात असलेला रोष आणि असंतोष कॅश करून घेण्यात डॉ. पाटील यशस्वी ठरले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एकजूट आणि ग्रामीण भागापासून पदवीधरांपर्यंत पोहोचलेली त्यांची शांत प्रतिमा त्यांच्या विजयाचा पाया ठरली.
पहिल्या फेरीत डॉ. प्रतापसिंह पाटील (७३,९३१) आणि सतीश चव्हाण (६०,७६८) हे आघाडीवर असले तरी दोघांनाही कोटा पूर्ण करता आला नाही. त्यानंतर निवडणूक नियमानुसार ३९ अपक्ष व इतर उमेदवारांची टप्प्याटप्प्याने वगळणी करण्यात आली आणि त्यांच्याकडील पसंतीची मते मुख्य दोन उमेदवारांकडे हस्तांतरित झाली.
या मतहस्तांतरणाच्या प्रक्रियेत अपक्ष उमेदवार रविराज सावळे-पाटील आणि इतर उमेदवारांच्या मतांचा मोठा हिस्सा डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या पारड्यात पडला. अखेरच्या टप्प्यात डॉ. प्रतापसिंह पाटील यांना एकूण ८५,८७६ मते मिळाली, तर सतीश चव्हाण यांना ६७,७५२ मते मिळाली. डॉ. पाटील यांनी १८,१२४ मतांचे घसघशीत मताधिक्य मिळवून हा ऐतिहासिक विजय आपल्या नावावर केला.