वडीगोद्रीः अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाण्यातून प्राधान्याने पाणी सोडण्यात यावे,या मागणीसाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शेतकरी व ग्रामस्थांनी गुरुवारी (2 ऑक्टोबर) शहापूर येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.या आंदोलनात परिसरातील शेतकरी,ग्रामस्थ तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.एकूणच दुष्काळ पेटला असून पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी यासाठी मोठी कसरत ग्रामीण भागांत करावी लागणार आहे. शासन स्तरावर या गंभीर प्रश्नावर गांभीर्याने आणि साकल्याने विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.
गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.सन 1988 पासून या प्रश्नासाठी शेतकरी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.मात्र,अद्यापही पाण्याचा प्रश्न कायम असल्याने संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उपलब्ध पाण्याच्या नियोजनात गल्हाटी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला प्राधान्य देण्यात यावे,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.गुंज,साष्ट-पिंपळगाव आणि गल्हाटी या भागांची एकत्रित पाण्याची मागणी सुमारे 25 दलघमी असून उपलब्ध पाणी सुमारे 12 दलघमी असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना गल्हाटीच्या लाभक्षेत्रातील गावे,शेतकऱ्यांची संख्या,पाण्याची वाढती गरज आणि पावसावर असलेले अवलंबित्व यांचा विचार करावा,अशी मागणी करण्यात आली. ‘शेतीसाठी तर दूरच,गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही,’ अशी व्यथा महिलांनी आंदोलनस्थळी व्यक्त केली.पाण्याच्या टंचाईमुळे गावातील काही कुटुंबांना स्थलांतर करावे लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महिलांनी केली.गल्हाटी परिसरातील मोठ्या संख्येने असलेल्या मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेवरही पाणीटंचाईचा परिणाम झाला आहे.जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.गल्हाटी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी उपलब्ध पाण्यातून प्रकल्पास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन केवळ आश्वासन न देता ठोस आणि कालबद्ध कार्यवाही करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान,उपोषण शांततामय मार्गाने करण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गल्हाटीच्या पाणी प्रश्नावर शासन व प्रशासन आता कोणती भूमिका घेते,याकडे परिसरातील शेतकरी,ग्रामस्थ,महिला आणि मच्छीमारांचे लक्ष लागले असून शासन पातळीवरून सकारात्मक निर्णय होण्याची गरज व्यक्त होत आहे.