‘नवदृष्टी’ची दशकपूर्ती; महिनाभरात ५५७० जणांची तपासणी, १२७० जणांना मोतीबिंदूचे निदान

दहा वर्षांत ११ हजार डोळ्यांत प्रकाश!

Jalna Nayak    03-Oct-2026
Total Views |

नेत्रशस्त्रक्रिया मोफत करून ग्रामीण आरोग्यसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
  
घनसावंगी :  ग्रामीण भागातील गरजूंच्या डोळ्यांतील अंधार दूर करण्यासाठी सुरू झालेल्या ‘नवदृष्टी महाभियाना’ने सेवाकार्याची दशकपूर्ती करत तब्बल ११ हजारांहून अधिक रुग्णांच्या डोळ्यांना नवप्रकाश दिला आहे. कर्मयोगी ॲड. अंकुशराव टोपे यांच्या विचारांना कृतीची जोड देत सुरू झालेल्या या अभियानाने जवळपास २०० गावांपर्यंत पोहोचून मोतीबिंदूसह विविध नेत्रशस्त्रक्रिया मोफत करून ग्रामीण आरोग्यसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कर्मयोगी ॲड.अंकुशराव टोपे यांचे ३ एप्रिल २०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या राजकारणासह समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि सेवा पोहोचविण्याचा त्यांचा विचार पुढे नेत माजी मंत्री राजेश टोपे यांनी गरजू नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.
याच संकल्पातून १८ सप्टेंबर २०१६ रोजी ग्रामीण रुग्णालय, घनसावंगी तसेच समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जे.जे. हॉस्पिटल, मुंबईचे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या पथकाने सुमारे तीन हजार रुग्णांची नेत्रतपासणी केली. यापैकी तब्बल ५०० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून देण्याचा शब्द डॉ. लहाने यांनी दिला आणि त्यातूनच ‘नवदृष्टी महाभियाना’च्या सेवाचळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
एका शिबिरातच मोठ्या संख्येने मोतीबिंदूचे रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागातील नेत्रविकाराची तीव्रता स्पष्ट झाली. त्यानंतर अभियानाची व्याप्ती सातत्याने वाढविण्यात आली. गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यांपर्यंत नेत्रतपासणीची सेवा पोहोचविण्यात आली. गेल्या दहा वर्षांत हजारो नागरिकांची तपासणी करून गरजू रुग्णांची निवड करण्यात आली आणि ११ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर मोतीबिंदूसह विविध नेत्रशस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.
कोरोना महामारीच्या काळातही परिस्थितीनुसार शक्य तितक्या प्रमाणात हे सेवाकार्य सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे ‘नवदृष्टी’ हे केवळ एखाद्या दिवसाचे आरोग्य शिबिर न राहता ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी सातत्याने कार्यरत असलेली सेवा चळवळ बनली.
 

नेत्रशस्त्रक्रिया मोफत करून ग्रामीण आरोग्यसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 
महिनाभरात ५५७० जणांची नेत्रतपासणी
कर्मयोगी ॲड. अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त यंदा १ सप्टेंबरपासून नवदृष्टी महाभियान अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला. १ ते ३० सप्टेंबर २०२६ या एका महिन्यात तब्बल ५५७० नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी १२७० रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले.
यातील ४५३ रुग्णांवर पुणे येथील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर हे रुग्ण सुखरूपपणे घरी परतले आहेत. उर्वरित गरजू रुग्णांवरही नियोजनानुसार उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. कर्मयोगी ॲड. अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या या अभियानाला दशकपूर्ती होत असताना सेवाकार्याची व्याप्ती आणखी वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना वेळेवर आणि मोफत नेत्रसेवा मिळावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमातून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.  कर्मयोगींच्या विचारांना कृतीची जोड देत सुरू असलेले हे सेवाकार्य त्यांच्या अनुयायांसाठी केवळ आरोग्य उपक्रम राहिलेले नाही. दृष्टी हिरावलेल्या डोळ्यांना प्रकाश देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारे हे ‘नवदृष्टी’ अभियान आता कृतज्ञतेतून सुरू असलेल्या सेवाचळवळीचे रूप घेत आहे.
 
“कर्मयोगी ॲड. अंकुशराव टोपे साहेबांनी आयुष्यभर सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखाला प्राधान्य दिले. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत ‘नवदृष्टी महाभियान’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा वर्षांत हजारो रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणता आला, ही आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. विशेषतः आर्थिक अडचणींमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या कुटुंबांना या अभियानाचा आधार मिळाला. एखाद्या व्यक्तीला पुन्हा स्पष्ट दिसू लागणे म्हणजे त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश निर्माण होणे आहे. ही सेवाव्रताची वाटचाल यापुढेही अधिक व्यापक करण्याचा आमचा निर्धार आहे.”
- राजेश टोपे, माजी आरोग्यमंत्री
 
डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे दैनंदिन कामे करताना मोठ्या अडचणी येत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ऑपरेशनचा खर्च करणेही शक्य नव्हते. ‘नवदृष्टी महाभियान’च्या माध्यमातून माझी तपासणी झाली आणि मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यानंतर पुणे येथे माझ्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशननंतर आता मला पूर्वीपेक्षा खूप स्पष्ट दिसत आहे. डोळ्यांसमोरचा अंधार दूर झाला आणि पुन्हा नव्याने जग पाहता येत आहे. आमच्यासारख्या गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून दिल्याबद्दल या अभियानाचे मनापासून आभार.
मुरलीधर जगदाळे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेला रुग्ण, घनसावंगी