नियम हे त्रास देण्यासाठी नव्हे तर सुरक्षेसाठी असतात

अन्न सुरक्षा प्रशिक्षण शिबिरात 49 कॅटरिंग व्यावसायिकांचा सहभाग

Jalna Nayak    03-Oct-2026
Total Views |
 
 विशेष शिबिरात शहरातील 49 कॅटरिंग व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला.
 
जालना: कॅटरिंग व्यवसायात अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सुरक्षित अन्न हाताळणीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने जालना केटरर्स असोसिएशनच्यावतीने शनिवार दि. 3 सप्टेंबर रोजी येथील मधुर बँक्वेट हॉलमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार पार पडलेल्या अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणीकरण या विशेष शिबिरात शहरातील 49 कॅटरिंग व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला.
राज्यात तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जालना केटरर्स असोसिएशनच्यावतीने मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष शिबिराचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निखिल कुलकर्णी यांच्याहस्ते आणि अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे, विनोद ओसावार, अधिकृत अन्नसुरक्षा प्रशिक्षक डॉ. रामेश्वर जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निखिल कुलकर्णी म्हणाले की, प्रशासकीय नियम हे अडथळा नसून, तुमचा दर्जा अधिक उंचावणारे कवच आहेत. अन्न व औषध प्रशासनाचा उद्देश कोणावरही विनाकारण कारवाई करणे नसून, उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आहे. कोणत्याही व्यवसायात निकोप स्पर्धा असावी; मात्र त्यासोबतच एक मजबूत आणि संघटित संघटना असणे काळाची गरज आहे.
अन्नसुरक्षा प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षक डॉ. रामेश्वर जाजू यांनी कॅटरिंग व्यावसायिक आणि स्टाफला प्रशिक्षण दिले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी अन्न सुरक्षेच्यादृष्टीने अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य, स्वयंपाकघर आणि वापरल्या जाणाऱ्या भांडी- उपकरणांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, कच्चे व शिजवलेले अन्न एकमेकांपासून वेगळे ठेवणे, जेणेकरून अन्नाचा संसर्ग टळेल,अन्नाचे योग्य तापमान राखणे, पिण्यासाठी व वापरासाठी शुद्ध पाण्याचा वापर आणि कीटक नियंत्रण यांसारख्या ग्राहकांपर्यंत सुरक्षित व दर्जेदार अन्न पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या शास्त्रीय पद्धती समजावून सांगितल्या.
या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम जयपुरिया, सुमित सारस्वत, गोपाल झंवर, कैलास महाराज शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात बंकटलाल खंडेलवाल, अर्जुन चौधरी, किशोर देशपांडे, दृष्टी लायन्स कॅन्टीन परतूर, अंकित मुथा, गोविंद मंत्री, मोहन इंगळे, राहुल व्यास, शिवम लाहोटी, प्रवीणकुमार मित्तल, नारायण महाराज गौड, महेश बिटले यांच्यासह राहुल व्यास, वरद मोहता, संजय पैठणकर, अंकित मुथा, प्रवीणकुमार मित्तल, पवन इंगळे, नारायण महाराज गौड, नेमीचंद गौड आदींसह शहरातील कॅटरिंग व्यावसायिक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
 
अव्यवहार्य जाचक अटी शिथिल कराव्यात-पुरुषोत्तम जयपुरिया
प्रास्ताविकात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया केटरिंग असोसिएशनचे पॅट्रन सदस्य तथा
केटरर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम जयपुरिया यांनी कॅटरर्सच्या भावना स्पष्टपणे मांडल्या. ते म्हणाले, आम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे स्वागतच करतो आणि कायद्याचे पालन करण्यासाठी प्रशासन, महाराष्ट्र असोसिएशन तसेच ऑल इंडिया असोसिएशनसोबत आम्ही पूर्णपणे बांधील आहोत. आयुक्त तुकाराम मुंढे कोणतीही नवीन गोष्ट लादत नसून केवळ नियमांची सक्ती करत आहेत. मात्र, कोणत्याही कार्यक्रमाची ८ दिवस आधी पूर्वपरवानगी घेणे ही अट कॅटरिंग व्यवसायाच्या दृष्टीने प्रत्यक्ष अंमलबजावणीत अत्यंत अव्यवहार्य आहे. अनेकदा क्लायंट अगदी ऐनवेळी ऑर्डर्स ठरवतात. अशा जाचक व नाहक त्रासाच्या नियमांबाबत आम्ही राज्यस्तरावर आयुक्त मुंढे यांच्याशी दोन बैठका घेऊन चर्चा केली असून ते नियम शिथिल करण्याची मागणी केली आहे. सर्व कॅटरर्सनी एकत्र येऊन ही संघटना अधिक मजबूत करावी व सर्वांनी कायदेशीर परवाने, जीएसटी व फास्टॅक प्रमाणपत्र मिळवून अधिकृतरीत्या व्यवसाय करावा, असे ते म्हणाले.