भोकरदन-जालना मार्गावर ट्रकची ॲपे रिक्षाला धडक; एक ठार, चार जखमी

डावरगाव वालसा येथील सुभाष वारे यांचा जागीच मृत्यू; चार जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Jalna Nayak    03-Oct-2026
Total Views |

सुभाष वारे
 
भोकरदन : भोकरदन-जालना मार्गावर डावरगावजवळ ॲपे रिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात डावरगाव वालसा येथील सुभाष वारे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ॲपे रिक्षातील चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डावरगाव येथील नागरिक सकाळी ॲपे रिक्षाने भोकरदनच्या दिशेने जात होते. यावेळी मागून भोकरदनकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच २० ईजी ८७८७ ने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये सुभाष वारे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुभाष वारे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची वार्ता डावरगाव येथे पोहोचताच गावावर शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. फकिरा साळवे, रुख्मिण नागवे, प्रतीक्षा नागवे आणि मंगलाबाई जाधव, सर्व रा. डावरगाव वालसा, हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन वर्षांपूर्वी मुलाचाही अपघाती मृत्यू
या दुर्घटनेने वारे कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, सुमारे सहा महिन्यांपूर्वीच सुभाष वारे यांच्या एका मुलाचाही अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सुभाष वारे यांचाही अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.