प्रा. डॉ. प्रियदर्शन भवरे
समाजशास्त्र विभाग,
बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. यंदा हा सप्ताह २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साजरा केला जात आहे. यावर्षीची संकल्पना ‘सत्यनिष्ठा से समृद्धि’ (Probity for Prosperity)अशी असून, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांच्या आधारे समृद्ध समाज व राष्ट्रनिर्मिती करण्याचा संदेश या संकल्पनेतून दिला जातो.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिकता ही मूल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. प्रत्येक नागरिकाने तसेच सार्वजनिक पदावर कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडली, तरच प्रशासन अधिक कार्यक्षम आणि समाज अधिक न्याय्य बनू शकतो.‘सत्यनिष्ठेतून समृद्धी’ हा केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न राहता तो आपल्या वैयक्तिक आचरणाचा आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे.भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जबाबदार व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणाची कास धरून भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूक राहणे, हीच या दक्षता जनजागृती सप्ताहाची खरी फलश्रुती ठरेल.भ्रष्टाचार हा केवळ पैशांचा गैरव्यवहार नाही, तर तो देशाच्या नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय पायाला पोखरणारा गंभीर आजार आहे. ज्याप्रमाणे शरीरात पसरलेला कर्करोग संपूर्ण शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट करतो, त्याचप्रमाणे भ्रष्टाचार लोकशाही व्यवस्था, विकासाची उद्दिष्टे आणि सामान्य माणसाचा प्रशासनावरील विश्वास आतून पोखरून काढतो. केवळ कायदे करून किंवा प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचार संपवता येत नाही, तर त्यासाठी प्रशासनातनैतिक आचरण, कठोर कायद्याची अंमलबजावणी, आणितंत्रज्ञानाधारित पारदर्शकताया त्रिसूत्रीची एकत्रित गरज आहे.
गरिबांच्या हक्कांवर आघात आणि मानवी पिळवणूक
भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा फटका समाजातील दुर्बल, कष्टकरी आणि गरीब घटकांना बसतो. स्वतःच्या हक्काचा जन्म-मृत्यू दाखला, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड किंवा घरकुल योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी जेव्हा गरिबांना लाच द्यावी लागते, तेव्हा ती केवळ आर्थिक पिळवणूक उरत नाही, तर सामाजिक न्यायाचा बळी ठरते. शासकीय कार्यालयांत कागदपत्रांमध्ये त्रुटी काढणे, विनाकारण चकरा मारायला लावणे आणि फाइल प्रलंबित ठेवणे ही अडवणुकीची सामान्य पद्धत बनली आहे.ज्यांच्या रोजच्या रोजीरोटीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, अशा वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही पैसे मोजावे लागणे हा कल्याणकारी राज्याचा मोठा विरोधाभास आहे.सार्वजनिक कार्यालये ही नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत, त्यांची अडवणूक किंवा लूट करण्यासाठी नाहीत.
भ्रष्टाचाराची संगठित साखळी
भ्रष्टाचार बहुतांश वेळा एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नसतो, तर गावपातळीवरील कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हितसंबंधांची साखळी पसरलेली असते.लाच घेणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाई होते, मात्र त्यामागील वरिष्ठ अधिकारी किंवा मध्यस्थांच्या साखळीकडे दुर्लक्ष केले जाते.या साखळीत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी पुराव्यांच्या आधारे निश्चित झाली पाहिजे.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संस्थात्मक संरक्षण मिळाले पाहिजे, तर पदाचा व सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाई झाली पाहिजे.
कायद्याचा धाक आणि निष्पक्ष कारवाई
कायद्याचा धाक उरला नाही की भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढते. तक्रार दाखल होऊनही चौकशी वर्षानुवर्षे रखडत राहिली, तर गैरव्यवहार करणाऱ्यांची हिंमत वाढते.भ्रष्टाचाराच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी, वेळेत पुराव्यांचे संकलन आणि जलद गतीने न्यायालयीन खटले चालवून दोषींना शिक्षा झाली पाहिजे.गरिबांच्या छोट्या चुकांवर तात्काळ कारवाई आणि बड्या अधिकाऱ्यांच्या कोट्यवधींच्या गैरव्यवहारांवर प्रदीर्घ मौन ही विसंगती संपली पाहिजे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या बेकायदेशीर मालमत्तेवर जप्तीची कारवाई करणे आणि गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्यांवरही सहआरोपी म्हणून गुन्हे नोंदवणे आवश्यक आहे.
शिक्षण व भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार: भविष्याशी प्रतारणा
नोकरभरती आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार हा देशाच्या भविष्याशी केलेला सर्वात मोठा खेळ आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटणे, गुणांमध्ये अनियमितता, आणि भरतीसाठी कोट्यवधी रुपयांची लाच घेतली जाणे यामुळे गुणवत्तेचा गळा घोटला जातो. ग्रामीण व गरीब घरातील तरुण वर्षानुवर्षे अभ्यास करून स्वप्ने पाहतात, परंतु पैशांच्या जोरावर अयोग्य व्यक्तींची निवड झाली की तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. प्राध्यापक, शिक्षक किंवा प्रशासकीय पदे जर पैशाने विकली जात असतील, तर अशी अनैतिक मार्गाने आलेली मंडळी विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार? भरती प्रक्रिया डिजिटल, सुरक्षित आणि संपूर्ण पारदर्शक ठेवून प्रश्नपत्रिका सुरक्षेचे कडक नियम लागू करणे ही काळाची गरज आहे.
ऑनलाइन सेवा व डिजिटलीकरण : भ्रष्टाचारावर थेट प्रहार
प्रशासनातील मानवी हस्तक्षेपाची आणि प्रत्यक्ष भेटीची गरज जितकी कमी होईल, तितका भ्रष्टाचाराचा वाव कमी होतो. सर्व दाखले, परवानग्या, सातबारा उतारे आणि कल्याणकारी योजनांचे अर्ज पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिले पाहिजेत.अर्जाचा स्वतंत्र क्रमांक देऊन तो कोणत्या टेबलवर किती दिवस प्रलंबित आहे, याचे ऑनलाइन ट्रॅकिंग झाले पाहिजे. मुदतीत काम न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. शासकीय शुल्काची यादी सार्वजनिक असावी, जेणेकरून अतिरिक्त पैसे उकळण्याची संधी राहणार नाही. डिजिटल साक्षरतेचा अभाव असलेल्या ग्रामीण जनतेसाठी अधिकृत सेवा केंद्रे सुरू करून तेथे मध्यस्थांची लूट रोखली पाहिजे.
नैतिक आचरण आणि सामाजिक दृष्टिकोनातील बदल
केवळ कायद्याच्या धाकाने भ्रष्टाचाराचे उच्चाटन शक्य नाही, जोपर्यंत सामाजिक मानसिकतेत बदल होत नाही. आज समाजात संपत्ती कोणत्या मार्गाने मिळवली यापेक्षा किती मिळवली, यावरून प्रतिष्ठा देण्याची चुकीची वृत्ती वाढली आहे. 'संधी मिळाली की फायदा घ्या' ही प्रवृत्ती बदलून कुटुंब, शाळा आणि महाविद्यालयांतून प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाची मूल्ये रुजवली पाहिजेत. शासकीय पद हे वैयक्तिक संपत्ती गोळा करण्याचे साधन नसून लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली नैतिक जबाबदारी आहे, ही जाणीव निर्माण झाली पाहिजे.
दक्षता सप्ताह: केवळ औपचारिकता नको, कृती आराखडा हवा
दरवर्षी दक्षता सप्ताहात शपथा घेतल्या जातात, व्याख्याने होतात; मात्र वर्षभरात प्रत्यक्ष कामात बदल झाला नाही तर या उपक्रमांचे फलित काय? दक्षता सप्ताहाचे रूपांतर वार्षिक कृती आराखड्यात झाले पाहिजे. प्रत्येक विभागाने वर्षभरात किती तक्रारी आल्या, किती निकाली निघाल्या आणि किती दोषींवर कारवाई झाली, याचा वार्षिक ताळेबंद जाहीर करावा. भ्रष्टाचाराची माहिती देणाऱ्या तक्रारदारांना कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर कोणताही दबाव येणार नाही. नैतिक मूल्यांचा भक्कम पाया, आधुनिक तंत्रज्ञानाचा पारदर्शक वापर आणि कायद्याचा दरारा या तिन्हींचा संगम झाल्याशिवाय भ्रष्टाचारमुक्त समाज उभा राहू शकत नाही. जेव्हा देशातील शेवटच्या घटकाला कोणत्याही मध्यस्थाशिवाय व लाच न देता शासकीय हक्क सन्मानाने मिळतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने पारदर्शक आणि न्याय्य लोकशाही साकार होईल.