'दिवाळी दिव्यांची, फटाक्यांची नव्हे!' : सर्वोच्च न्यायालयाच्या पावलावर पाऊल ठेवून जालन्यातही जनजागृती मोहीम राबवा; ॲड. महेश धन्नावत यांची मागणी

सार्वजनिक फलकांच्या माध्यमातून "फटाकेमुक्त दिवाळी"ची मोहीम गतिमान करावी

Jalna Nayak    30-Oct-2026
Total Views |
 
महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला
 
जालना / विशेष वृत्त : दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या हवेच्या प्रदूषणाबाबत गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने फटाकेमुक्त दिवाळीसाठी विराट कोहलीसारख्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांची आणि नामवंतांची मदत घेण्याची महत्त्वपूर्ण सूचना केंद्र व संबंधित प्रशासनाला केली आहे. याच धर्तीवर जालन्यातही वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश पोहोचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घ्यावी, असा सूर आता उमटू लागला आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, दिवाळी हा मूळतः दिव्यांचा सण आहे आणि उत्सव साजरा करताना कोणाच्याही आरोग्याला बाधा पोहोचू नये. घटनेच्या कलम २५ अन्वये मिळणारे धार्मिक स्वातंत्र्य हे सार्वजनिक आरोग्याच्या अधीन आहे, अशी चपखल टिप्पणीही न्यायालयाने केली आहे. केवळ कायदेशीर बंदी किंवा कारवाईवर विसंबून न राहता प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून समाजमनात बदल घडवून आणणे अधिक परिणामकारक ठरेल, यावर खंडपीठाने भर दिला.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेचा दाखला देत जालन्याचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारची प्रशासकीय व सामाजिक मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आपले मत मांडताना ॲड. महेश धन्नावत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने फटाकेमुक्त दिवाळीसाठी समाजात आदराचे स्थान असलेल्या मान्यवरांचा जनजागृतीसाठी वापर करण्याचा दिलेला सल्ला अत्यंत दिशादर्शक आहे. केवळ दिल्लीच नव्हे, तर महाराष्ट्रातील जालन्यासारख्या वाढत्या शहरातही दिवाळीच्या काळात हवेचे व ध्वनीचे प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो."
पुढे बोलताना ॲड. महेश धन्नावत म्हणाले, "जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि जालना महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा हे अत्यंत प्रभावी, धडाडीचे आणि समाजात आदर असलेले उच्चपदस्थ नेतृत्व लाभले आहे. या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समाजात मोठा प्रभाव असून त्यांच्या आवाहानाला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यामुळे शासनाने व प्रशासनाने या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडिओ संदेश, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृतीपर कार्यक्रम आणि सार्वजनिक फलकांच्या माध्यमातून 'फटाकेमुक्त दिवाळी'ची मोहीम गतिमान करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, लहान मुले आणि तरुण पिढीला या मोहिमेत सहभागी करून घेतल्यास घराघरांतून फटाकेविरोधी प्रबोधन घडून येईल आणि जालन्यात खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व निरोगी दिवाळी साजरी होईल."