दुष्काळी जालन्यात ड्रोनद्वारे कृत्रिम पावसाचा प्रयोग!

४०० मीटर उंचीवरून ढगांमध्ये सीडिंग द्रव्याची फवारणी; स्वदेशी तंत्रज्ञानाच्या चाचणीने पावसाच्या नव्या आशा

Jalna Nayak    31-Oct-2026
Total Views |

क्लाउड सीडिंगची प्रायोगिक चाचणी
जालना / प्रतिनिधी
दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या जालना जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रयोग करण्यात आला आहे. डॉ. बळीराम बागल यांच्या पुढाकारातून स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून क्लाउड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. या प्रयोगात ड्रोनच्या साहाय्याने सुमारे ४०० मीटर उंचीवर जाऊन ढगांमध्ये क्षार आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली. दुष्काळी भागात कृत्रिम पावसासाठी ड्रोन तंत्रज्ञान कितपत उपयुक्त ठरू शकते, याची पडताळणी या प्रयोगातून करण्यात येत आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आतापर्यंत प्रामुख्याने विमानांचा वापर केला जातो. मात्र, विमानांच्या तुलनेत कमी खर्चात, ठरावीक क्षेत्रात आणि आवश्यकतेनुसार ड्रोनच्या माध्यमातून क्लाउड सीडिंग करणे शक्य आहे का, हा या प्रयोगामागील मुख्य उद्देश आहे. स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ढगांपर्यंत पोहोचून सीडिंग द्रव्याची फवारणी करण्याची प्रक्रिया या चाचणीत राबविण्यात आली.
क्लाउड सीडिंगमध्ये ढगांमध्ये विशिष्ट क्षार किंवा रासायनिक कणांची फवारणी करून पर्जन्यनिर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी वातावरणात योग्य प्रमाणात आर्द्रता आणि अनुकूल ढग असणे आवश्यक असते. त्यामुळे केवळ फवारणी केली म्हणजे पाऊस पडेलच, असे नाही.
स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेली ही चाचणी यशस्वी ठरल्यास भविष्यात दुष्काळी भागांसाठी कृत्रिम पावसाचा पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेषतः विमानांच्या तुलनेत कमी खर्च, विशिष्ट ठिकाणी लक्ष्य केंद्रित करण्याची क्षमता आणि गरजेनुसार प्रयोग करण्याची सुविधा या दृष्टीने ड्रोन तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरू शकते.
मात्र, या प्रयोगामुळे प्रत्यक्ष पर्जन्यमानात किती वाढ होते, कृत्रिम पाऊस पाडण्यात हे तंत्रज्ञान कितपत यशस्वी ठरते, याचे निष्कर्ष पुढील निरीक्षण आणि चाचण्यांनंतरच स्पष्ट होतील. पावसाअभावी पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जालना जिल्ह्यात त्यामुळे या प्रयोगाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
 कृत्रिम पावसाची नवी दिशा!
हा प्रयोग दुष्काळी भागांसाठी तंत्रज्ञानाचा नवा पर्याय ठरू शकतो. पारंपरिक विमानांऐवजी ड्रोनच्या साहाय्याने ढगांमध्ये सीडिंग द्रव्याची फवारणी करण्याची संकल्पना या प्रयोगातून तपासण्यात आली. कमी खर्चात आणि आवश्यक त्या ठिकाणी क्लाउड सीडिंग करता येण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, प्रत्यक्ष पाऊस पडण्याच्या परिणामकारकतेसाठी पुढील चाचण्या आणि निरीक्षणे आवश्यक आहेत.
डॉ. बळीराम बागल,
संचालक, संजीवनी हॉस्पिटल, जालना