
जालना : गुजरात राज्यातील बनासकांठा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित पीएम किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्ता वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे दाखविण्यात आले. परिसरातील शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी या थेट प्रक्षेपणाला उपस्थित राहून पंतप्रधानांचा कार्यक्रम अनुभवला. यानिमित्ताने रब्बी हंगाम शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता पंडित वासरे हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, कमी पाण्यात शेतीचे नियोजन, पशुधन संगोपन व चारा व्यवस्थापन तसेच दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन या विषयांवर कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता प्रा. पंडित वासरे, मृदशास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सोनुने यांनी केले.
मसाला प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण आणि रेशीम हातमाग पूर्वतयारी प्रशिक्षण या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाचे आयोजन देखील याच कार्यक्रमात करण्यात आले होते, यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्यांची मनोगतही त्यांनी यावेळी मांडले.या प्रशिक्षणामध्ये श्रीमती शिवरानी जांगडे आणि शुभांगी हाडुले या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणामधील अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शशिकांत पाटील यांनी केले तर आभार डॉ. संगीता कऱ्हाळे यांनी केले.