जालना: शनि मंदिर उड्डाणपुलावरून कंटेनर धाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अनियंत्रित झालेला हा कंटेनर उड्डाणपुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या "एकता धाब्या"वर जाऊन आदळला

Jalna Nayak    31-Oct-2026
Total Views |
 
शनि मंदिर उड्डाणपुलावर भरधाव कंटेनर
 
जालना: जालना शहरातील शनि मंदिर उड्डाणपुलावर भरधाव कंटेनर (क्रमांक एचआर ३९ ई ७८८६) उड्डाणपुलाचे ५ ते ७ संरक्षक कठडे तोडून थेट खाली एका धाब्यावर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्दैवी अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, अन्य ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार, सदर कंटेनर अतिशय वेगात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अनियंत्रित झालेला हा कंटेनर उड्डाणपुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या 'एकता धाब्या'वर जाऊन आदळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे धाब्यावर जेवण करण्यासाठी आलेले ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली व प्रचंड पळापळ झाली. या दुर्घटनेत धाब्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच कदिम जालना पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य राबवत जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात मृत पावलेले दोन्ही इसम हे कंटेनरमधीलच असावेत.या भीषण अपघातामुळे उड्डाणपुलांवरून धावणाऱ्या अवजड आणि भरधाव वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.