विद्यार्थी विकासासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संस्थेचे कायम पाठबळ - संजय अग्रवाल

दानकुंवर महिला महाविद्यालयात सेवा गौरव समारंभात व्यक्त केले मत

Jalna Nayak    31-Oct-2026
Total Views |
 
 श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात
 
जालना : शिक्षण संस्थेचा विकास हा केवळ भौतिक सुविधांच्या विस्तारातून होत नसतो, तर संस्थेतील प्रत्येक कर्मचारी आपल्या जबाबदाऱ्या किती निष्ठेने आणि समर्पित भावनेने पार पाडतो, यावर संस्थेची प्रगती अवलंबून असते. विद्यार्थी विकास हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीशी संस्था कायम भक्कमपणे उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडल्यास स्वतःच्या प्रगतीसोबतच संस्थेचाही विकास साधता येतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने विद्यार्थी विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट मानून कार्यरत राहावे, असे प्रतिपादन श्रीमती दानकुंवर हिन्दी कन्या विद्यालय समितीचे कोषाध्यक्ष संजय अग्रवाल यांनी केले. येथील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात वाणिज्य विभागप्रमुख विजय नागोरी यांच्या सेवा गौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित या समारंभात विजय नागोरी यांच्या शैक्षणिक व संस्थात्मक योगदानाचा गौरव करण्यात आला.यावेळी संस्थेचे सहसचिव नरेश अग्रवाल, संचालक विनोद अग्रवाल, जगदीश अग्रवाल, सागर अग्रवाल, श्लोक अग्रवाल, प्रशासकीय अधिकारी डॉ. विद्या पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. जितेंद्र अहिरराव, उपप्राचार्या पूजा अरोरा आणि सत्कारमूर्ती विजय नागोरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना संजय अग्रवाल पुढे म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या जडणघडणीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे एवढ्यापुरते शिक्षकांचे कार्य मर्यादित नसून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्याची जबाबदारीही शिक्षकांवर असते. संस्थेच्या उद्दिष्टांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची संस्था नेहमीच दखल घेत असते. कामातील सातत्य, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांविषयीची आस्था या बाबी संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत. कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या विकासात आपले योगदान देतानाच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सहसचिव नरेश अग्रवाल यांनी विजय नागोरी यांच्या कार्याचा गौरव करताना संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. प्रशासकीय अधिकारी डॉ. विद्या पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. जितेंद्र अहिरराव, डॉ. अंजू कुलकर्णी, डॉ. अंकिता सेन यांच्यासह विद्यार्थिनी भूमिका आढाव आणि वैष्णवी उगले यांनी मनोगत व्यक्त केले. वक्त्यांनी विजय नागोरी यांच्यासोबतच्या कामाच्या अनुभवांना उजाळा देत त्यांच्या कार्याविषयी आदरभाव व्यक्त केला. त्यांच्या कार्यनिष्ठा, सहकार्याची भावना आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.
समारंभात संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने विजय नागोरी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कारामुळे सहकाऱ्यांमधील जिव्हाळा, परस्पर आदर आणि संस्थेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजू कुलकर्णी आणि डॉ. अंकिता सेन यांनी केले. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या सहभागामुळे सेवा गौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.