नाशिक : हजारो वर्षांच्या श्रद्धेचा वारसा… प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी… भगवान शंकराच्या सान्निध्याने पुनीत झालेले त्र्यंबकेश्वर आणि कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा अखंड प्रवाह असलेली गोदामाई! अशा पवित्र वातावरणात नाशिकच्या गोदातीरावर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश घुमला. सिंहस्थ कुंभपर्व हे केवळ धार्मिक आयोजन नसून भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा उत्सव आहे. या श्रद्धेच्या महासंगमाला पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि आधुनिकतेची जोड देऊन आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त गोदाघाटावर आयोजित महागोदा आरती कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. यावेळी त्यांनी व इतर मान्यवरांनी गोदापूजन केले. ‘पवित्र नाशिक नगरीला माझा नमस्कार’ अशा मराठी शब्दांत भाषणाची सुरुवात करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येण्याचा विशेष आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वूईके, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे साधू-महंत, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.
गोदावरीच्या महागोदा आरतीसाठी ६ हजार ५०० आदिवासी बांधव सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सनातन संस्कृतीच्या जतनात आदिवासी जनजातींचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य, दिव्य आणि सुंदर करण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या कुंभगीत व संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ व त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे विमोचन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. हे विशेष टपाल तिकिट रामचंद्र जायभावे यांनी राष्ट्रपती महोदयांना सुपूर्द केले. या उपक्रमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा टपाल तिकिटांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्यात आली.