दुचाकीची उभ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, दोघे जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी

भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील चार तरुण

Jalna Nayak    31-Oct-2026
Total Views |
 
अपघातात दोघे जण जागीच ठार झाले
 
धावडा (प्रतिनिधी):भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील चार तरुण मिस्त्री काम आटोपून परतत असताना, जालना-छत्रपती संभाजीनगर जिल्हा सीमेवरील जळकी बाजार फाट्या जवळ एक दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या पंचर ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार (दि. ३१) रोजी सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास घडला.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीक्षेत्र जाळीचा देव येथील चार तरुण सिल्लोड तालुक्यातील मादणी येथे मिस्त्री कामासाठी गेले होते. दिवसभराचे काम पूर्ण झाल्यानंतर ते आपली एमएच २१ बी एम ५०७१ (MH21B M5071) क्रमांकाच्या दुचाकीवरून गावाकडे परतत होते. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील धावडापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जळकी बाजार फाट्याजवळ एक ट्रॅक्टर-ट्रॉली पंचर झाल्यामुळे रस्त्यावरच उभी करण्यात आली होती. अंधारात चालकाचा अंदाज न आल्यामुळे त्यांची भरधाव दुचाकी या उभ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर जाऊन आदळली.
मृत्यू व जखमींची नावे:
अपघाताची धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेसाळत गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात संदीप शामधन मंडावत (वय ३४), सचिन नंदू जामुंदे (वय ३२)दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत विकास भीमराव कपाटे (वय ४५) आणि प्रशांत व्यंदेशकर (वय ३५) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतक संदीप मंडावत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे, तर सचिन जामुंदे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. या अचानक ओढवलेल्या आघातामुळे श्रीक्षेत्र जाळीचा देव गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळाची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल भागवत शेळके, व्ही. आर. पवार आणि दगडू तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करीत आहेत.