बदनापूर : ‘उद्या पैसे देतो, परवा पैसे देतो’, असे सांगून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत तब्बल १५ लाख ४२ हजार ८८५ रुपयांचे टोमॅटो खरेदी करून व्यापारी आपल्या दोन साथीदारांसह पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी केळीगव्हाण (ता. बदनापूर) येथील शेतकरी प्रल्हाद बाबुराव टकले यांच्यासह ४० हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार बदनापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
केळीगव्हाण परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा टोमॅटोचे पीक घेतले होते. १७ सप्टेंबरपासून टोमॅटोचा माल बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत होता. याचदरम्यान व्यापारी सागर चिमण काकड व त्याच्या दोन साथीदारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करण्यास सुरुवात केली. टोमॅटोचा माल घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी पैशांची मागणी केली असता, ‘उद्या देतो’, ‘परवा देतो’, असे सांगून व्यापाऱ्याने वेळ मारून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी टोमॅटोचा माल देणे सुरूच ठेवले.
व्यापारी पसार; फोनही स्विच ऑफ
२८ सप्टेंबर रोजी व्यापारी व त्याचे साथीदार बस्तान गुंडाळून पसार झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधला असता, ‘मी संगमनेरला जात आहे, परत आल्यानंतर पैसे देतो’, असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मात्र ३० सप्टेंबरपासून व्यापाऱ्याचा मोबाईल बंद येऊ लागल्याने शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी बदनापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
४० हून अधिक शेतकरी फसले
या प्रकरणात ४० हून अधिक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. टोमॅटो विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर अनेक शेतकऱ्यांचे घरखर्च, शेतीचा खर्च आणि पुढील हंगामाचे नियोजन अवलंबून असताना मोठी रक्कम अडकून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तक्रारीनुसार, एकूण १५ लाख ४२ हजार ८८५ रुपयांचा टोमॅटोचा माल खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापारी पसार झाल्याचा आरोप आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी सागर चिमण काकड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, संबंधित व्यापारी व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, टोमॅटो विकल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतमाल विक्रीच्या व्यवहारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच अडकलेली रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.