घनसावंगी : अविनाश घोगरे
घनसावंगी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास आरसीसी कॉलम अचानक ढासळल्याने झालेल्या दुर्घटनेत कॉलमच्या खाली दबून एका ३४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनंत अशोक भरपूर (वय ३४, रा. रूई, ता. अंबड) असे मृत कामगाराचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेसह कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, घटनेची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी होत आहे.
घनसावंगी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. अनंत भरपूर हे इमारतीच्या वरच्या भागात काम करीत होते. रविवारी सायंकाळी काम सुरू असतानाच अचानक आरसीसी कॉलम ढासळला. यावेळी कॉलमच्या खाली अनंत भरपूर दबले. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनानेही तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने अनंत भरपूर यांचा मृत्यू झाला. हे समजले
या दुर्घटनेमुळे पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरसीसी कॉलम अचानक कोणत्या कारणामुळे ढासळला? बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता योग्य होती का? बांधकाम करताना तांत्रिक मानकांचे पालन करण्यात आले होते का? तसेच बांधकामाची पाहणी व देखरेख योग्य पद्धतीने होत होती का, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. कॉलम नेमका कोणत्या कारणामुळे ढासळला, हे तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सुरक्षा किट नसल्याचा नातेवाईकांचा दावा
दरम्यान, मृत कामगाराच्या नातेवाईकांनी बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा दावा केला आहे. धोकादायक ठिकाणी काम करून घेताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकारदुर्घटनेनंतर मृत कामगाराच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. बांधकामाची सखोल चौकशी करून दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे रात्री 9:30 वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला नव्हता.
दरम्यान, तहसीलदार यांनी नातेवाईकांशी मध्यस्थी करून चर्चा केली. प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच दुर्घटनेची चौकशी केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर प्रकरणातील तणाव निवळला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगरअनंत अशोक भरपूर यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व कुटुंबीय असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने भरपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत कामगाराच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
सखोल तांत्रिक चौकशीची मागणीआरसीसी कॉलम ढासळण्याचे नेमके कारण, बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता, बांधकामाची तांत्रिक पद्धत, संरचनेची सुरक्षितता तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सखोल तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नागरिक व नातेवाईकांकडून होत आहे. निष्पक्ष चौकशी करून दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करावी, दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि मृत कामगाराच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.