जालना: जालना विधानसभा मतदारसंघातील वडगाव, वखारी, बाजीउमरद, मौजपुरी, भिलपुरी, निरखेडा, आदी गावांना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी नुकसान झालेल्या कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, मूग आदी खरीप पिकांसह मोसंबी व द्राक्ष यांसारख्या फळपिकांचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आ. अर्जुनराव खोतकर म्हणाले की, “दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकरी, कामगार आणि शेतमजूर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जवळपास ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाणीटंचाईची तीव्रता आतापासूनच जाणवू लागली आहे.”
ते पुढे म्हणाले, “या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मी आपला प्रतिनिधी म्हणून शासन दरबारी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न ठामपणे मांडणार आहे. शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आपण सर्वांनी एकजुटीने या गंभीर परिस्थितीचा सामना करूया,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, माजी सभापती पांडुरंग डोंगरे, गणेश मोहिते, तालुकाप्रमुख भगवान अंभोरे, नागेश डवले, नरसिंह गोरे,माजी सभापती मुरलीधर थेटे,वसंतराव राजे जाधव, काशिनाथ जाधव, बापुराव जाधव,चेअरमन रमेश जाधव, आप्पासाहेब उगले, भाऊसाहेब गोरे,सरपंच काकासाहेब घुले विष्णू ढोकळे, अप्पासाहेब डोंगरे, गोपाल डोंगरे, गणेश घुले, बळीराम घुले, दत्ता थेटे, किसनराव डवले, सावळाराम डोंगरे,उपसरपंच सोनाजी भुतेकर,नकुल भुतेकर,विनायक घुले, हरिभाऊ घुले, शहादेव तिरुखे, रवींद्र राठोड, मुरलीधर पवार उपस्थित होते.