जालन्यात डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?डॉक्टरांना धमकावणे, खंडणी व बदनामीच्या तक्रारींवर IMA आक्रमक

पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी

Jalna Nayak    05-Oct-2026
Total Views |
 
 IMAच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
 
जालना- जालना शहरातील खासगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कथितरीत्या धमकावणे, खंडणीसाठी दबाव आणणे, उपचाराच्या बिलावरून वाद निर्माण करणे तसेच सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर डॉक्टरांची बदनामी करण्याचे प्रकार वाढत असल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), जालना शाखेने केला आहे. या पार्श्वभूमीवर IMAच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक तेगबिर सिंह यांनी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करून सर्व ती मदत व संरक्षण देण्याचे आश्वासन यावेळी दिल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ.बळीराम बागल यांनी सांगितले.
IMA जालना शाखेचे अध्यक्ष डॉ. बळीराम बागल आणि सचिव डॉ. प्रल्हाद धारूरकर यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले आहे. IMAच्या म्हणण्यानुसार, काही प्रकरणांमध्ये डॉक्टर व प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचे तसेच आर्थिक तडजोडीसाठी धमकावण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खंडणी व ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढल्याचा दावा
IMAने निवेदनात ‘Extortion & Blackmail’ संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रुग्णालये किंवा डॉक्टरांना लक्ष्य करून धमकावणे, आर्थिक तडजोडीसाठी मानसिक दबाव निर्माण करणे आणि ब्लॅकमेल करण्याचे प्रकार गंभीर असल्याचे संघटनेने म्हटले आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर पूर्वनिश्चित पद्धतीने रुग्णालयाचे देयक न भरता त्यासाठी प्रशासनावर दबाव आणणे तसेच दमदाटी करून बिलाची माफी मागण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांखेरीज काही असंबंधित व्यक्ती किंवा कथित कार्यकर्ते रुग्णालयांमध्ये हस्तक्षेप करून चौकशी किंवा तक्रारी करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप IMAने केला आहे. वैद्यकीय ज्ञानाचा अभाव असतानाही केवळ दबाव निर्माण करण्यासाठी खोट्या किंवा बिनबुडाच्या तक्रारी दाखल केल्या जात असल्याचे निवेदनात नमूद आहे.
वैद्यकीय किंवा प्रशासकीय चौकशी होण्यापूर्वीच काही व्यक्तींकडून सोशल मीडिया आणि विविध प्रसारमाध्यमांवर डॉक्टरांविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जात असल्याचा आरोप IMAने केला आहे. त्यामुळे डॉक्टरांची सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमा धोक्यात येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
IMAच्या प्रमुख मागण्या
  1. IMA जालना शाखेने पोलिसांकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत
  2. डॉक्टर अथवा रुग्णालयाकडून धमकी किंवा खंडणीबाबत तक्रार आल्यास तिची लेखी नोंद घेऊन तत्काळ कायदेशीर कारवाई करावी.
  3. रुग्णालयात घुसून तोडफोड किंवा इतर प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर गुन्हे दाखल करावेत.
  4. सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून पूर्वचौकशीशिवाय डॉक्टरांविरोधात बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
  5. पोलीस विभाग आणि IMA यांच्यात नियमित समन्वयासाठी संपर्क अधिकारी/नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
  6. जालना शहरातील वैद्यकीय क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याने पोलिसांनी या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी IMA जालना शाखेने केली आहे.