‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना’मॅजिक-आयटीआयचा उद्योजकतेचा मंत्र

७५ प्रकल्पांतून २५ अंतिम फेरीत; ‘वेस्ट ऑइल कुकिंग’ आणि ‘ऍग्रिनोवा’ ठरले विजेते

Jalna Nayak    06-Oct-2026
Total Views |
 
मॅजिक-आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटरचा प्रथम वर्धापनदिन
 
जालना- नोकरीच्या शोधात राहण्याऐवजी स्वतः उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या नव्या पिढीचे उद्योजक घडविण्याचा संकल्प मॅजिक-आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटरच्या मंगळवारी आयोजित प्रथम वर्धापनदिनानिमित्त करण्यात आला. ‘कल्पनेपासून उत्पन्नापर्यंत’ या संकल्पनेवर भर देत विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मॅजिक-आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटरचा प्रथम वर्धापनदिन तसेच मॅजिक आयडिया हॅकाथॉन २०२६ ची अंतिम फेरी मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक विभाग, छत्रपती संभाजीनगरचे सहसंचालक प्रदीप दुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. मॅजिक आयडिया हॅकाथॉनमध्ये विविध संस्थांमधून आलेल्या ७५ प्रकल्पांमधून २५ प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण केले. कल्पनेतील नावीन्य, वेगळा विचार, प्रत्यक्ष समस्या सोडविण्याची क्षमता आणि भविष्यात उद्योगात रूपांतर होण्याची शक्यता या निकषांवर परीक्षक संदीप काळे, श्रीपाद कुलकर्णी आणि मंगेश मोकल यांनी प्रकल्पांचे मूल्यांकन केले. आयटीआय गटात ‘वेस्ट ऑइल कुकिंग’ या प्रकल्पाने विजेतेपद पटकावले. सौरभ मधुकर राऊत यांनी गॅसच्या तुटवड्याच्या काळात पर्यायी शेगडी तयार करून तिचे उत्पादन व विक्री सुरू केल्याची माहिती दिली. विविध आकारांच्या सुमारे २०० शेगड्यांची सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कर्नाटक आणि मराठवाड्यात विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले.
नॉन-आयटीआय गटात ‘ऍग्रिनोवा’ या सौरऊर्जेवर आधारित स्मार्ट शेती व काढणीनंतरच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पाने विजेतेपद मिळविले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मॅजिक-आयटीआयच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. उपलब्ध संसाधने आणि मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घेऊन जालना व मराठवाड्याला कौशल्य आणि नवोन्मेषाचे केंद्र बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मॅजिक-आयटीआयच्या इनक्युबेशन सेंटरमधून आतापर्यंत ११ नवउद्योग उभे राहिले असून, मॅजिकच्या एकूण परिसंस्थेत १८५ नवउद्योगांशी संबंधित उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मॅजिक-आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटरचा प्रथम वर्धापनदिन
 
प्रदीप दुर्गे यांनी विद्यार्थ्यांनी आयटीआय शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून न पाहता उद्योजकतेची संधी म्हणून पाहावे, असे आवाहन केले. ‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना’, असा संदेश त्यांनी दिला. पीएम सेतू योजनेअंतर्गत जालना आयटीआयचा समूहामध्ये सहभाग असून, त्यातून कौशल्य विकासाच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मॅजिकचे संचालक रितेश मिश्रा यांनी ‘कल्पनेपासून उत्पन्नापर्यंत’ ही संकल्पना मांडत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना मॅजिककडे घेऊन याव्यात, त्यांचे व्यवसायात रूपांतर होईपर्यंत मार्गदर्शन व सहकार्य करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, औद्योगिक गृहव्यवस्था आणि वेल्डिंग या चार अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची सुरुवात लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मॅजिकचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोकिळ यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच नवोन्मेष आणि उद्योजकतेची जिज्ञासा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सुमारे १२ अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारण्यासाठी मॅजिकने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १४६ अटल टिंकरिंग प्रयोगशाळांच्या समन्वयाची जबाबदारीही मॅजिककडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी वस्तू उघडून त्यामागील तंत्रज्ञान समजून घ्यावे, यासाठी ‘जिज्ञासा कक्ष’ विकसित करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.
यावेळी सुनील रायठठ्ठा, रितेश मिश्रा, अनुज बन्सल, अतुल केसकर, अभिजीत अल्टे, तृप्ती भोपे, गणेश चिमणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मकरंद भालेराव यांनी केले. आभार सीईओ मकरंद कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राघवेंद्र कुलकर्णी, देविदास राठोड, कृष्णा शिंदे आणि आविष्कार पाटील यांनी प्रयत्न केले.

मॅजिक-आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटरचा प्रथम वर्धापनदिन
 ‘कल्पनेपासून उत्पन्नापर्यंत’ उद्योजकतेचा संदेश
मॅजिक-आयटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संसाधने, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यावा. जालना आणि मराठवाड्याला कौशल्य व नवोन्मेषाचे केंद्र बनविण्यात तरुणांनी योगदान द्यावे. मराठवाड्यात रोजगारनिर्मितीची मोठी गरज असून, त्यासाठी उद्योग आणि उद्योजक निर्माण होणे आवश्यक आहे. मॅजिकच्या माध्यमातून या दिशेने होत असलेले काम महत्त्वाचे आहे.
- आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी, जालना
 
 संधीचे सोने करा
आयटीआयकडे केवळ नोकरी मिळविण्याचे माध्यम म्हणून पाहू नका. आयटीआयमध्ये प्रवेश घेतानाच उद्योजकतेची पहिली पायरी चढल्याचे विद्यार्थ्यांनी मानावे. नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना. पीएम सेतू योजनेमुळे कौशल्य विकासाच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी करावा.
- प्रदीप दुर्गे, सहसंचालक, आयटीआय
 
कल्पनेपासून उत्पन्नापर्यंत..
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना आमच्यापर्यंत आणाव्यात. त्या कल्पनेचे व्यवसायात रूपांतर होईपर्यंत मार्गदर्शन, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि आवश्यक मदत देण्याचा प्रयत्न मॅजिक करणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे प्रत्यक्ष उद्योगात रूपांतर व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील.
- रितेश मिश्रा, मॅजिक संचालक