रेणुकामातेच्या भक्तीचा जागर! सोमठाण्यात ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा सोहळा

भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी; घटस्थापनेपासून अष्टमीच्या होमहवनापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Jalna Nayak    07-Oct-2026
Total Views |

सोमठाणा येथील प्रसिद्ध श्री रेणुकादेवी
 
किशोर सिरसाठ
बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील प्रसिद्ध श्री रेणुकादेवी व महादेव मंदिर संस्थानच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ पासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असून, नऊ दिवस मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसह आवश्यक सुविधांची तयारी केली आहे.
संस्थानचे अध्यक्ष रामकिसनजी मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्राच्या प्रारंभी विधिवत घटस्थापना करण्यात येणार असून, त्यानंतर ब्राह्मण पुरोहितांच्या हस्ते सप्तशती पाठ, सकाळी, दुपारी व सायंकाळी आरती, भागवत पूजा आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज नामवंत महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी विशेष होम-हवन व पूजाविधी पार पडणार आहे. त्यामुळे परिसरातील भाविकांसाठी हा धार्मिक सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे. रेणुकामातेच्या दर्शनासाठी नवरात्र काळात मोठ्या संख्येने भाविक सोमठाणा येथे दाखल होण्याची शक्यता आहे.भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने प्रसाद, पिण्याचे पाणी, मंडप तसेच लाईट डेकोरेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
 
“नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव आहे. यंदाही नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रेणुकामातेचे दर्शन घ्यावे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.” - रामकिसन मेंढे, अध्यक्ष, श्री रेणुकादेवी व महादेव मंदिर संस्थान, सोमठाणा