जालनाः पैशासाठी सासरच्या मंडळींनी माझ्या मुलीचा खून केला !

पित्याची आर्त हाक, कठोर कारवाईची मागणी

Jalna Nayak    07-Oct-2026
Total Views |

मृत ऋतुजा महाजन-वानरे
 
जालनाः सासरच्या मंडळीच्या छळामुळे आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळीने माझ्या मुलीचा खून केल्याचा आरोप एका पित्याने केला आहे. सोन्यासारखी मुलगी आत्महत्या करू शकत नाही तिचा खून झाला असून आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची आर्त मागणी पित्याने केली आहे. या संदर्भात पोलिसांनीही वेगवेगळ्या बाजूंनी तपास करून माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी जालना शहरातील रहिवासी प्रल्हाद बापूराव वानरे यांनी केली आहे. सासरच्या मंडळीमुळे सोन्यासारखी पोर आमच्यात नसल्याची विदारक काहणी आहे एका पित्याची...
याबाबत दिलेल्या निवेदनात प्रल्हाद बापूराव वानरे यांनी म्हटले आहे की, आपली मुलगी ऋतुजा हिचा विवाह 24/4/2022 रोजी वाशीम जिल्ह्यातील यवता येथील गणेश विलास महाजन यांच्याशी झाला होता, जावई गणेश महाजन हे पंजाब सिंध बँकेत नोकरीस असल्याने ते लुधियाना जिल्ह्यातील जगरा येथे राहायला गेले. विवाहानंतर गणेश महाजन यांनी माझ्या मुलीस पैश्यासाठी त्रास देणे सुरू केले.मी गणेश महाजन यांना नवीन घर घेण्यासाठी 2 लाख रुपये दिले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये गणेश महाजन यांची बदली चाकण (पुणे) येथे झाली. ऋतुजा हिचा तिचा पती गणेश महाजन, वडील विलास, आई अलका, दीर अमोल यांनी पैश्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. 30.09.2026 रोजी जावई गणेश महाजन यांनी संध्याकाळी 7.56 मि. माझा मुलगा रामचंद्र वानरे यास फोन करून ऋतुजा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे सांगितले.यानंतर माझ्या मुलास पोलीस कॉस्टेबल उमेश जाधव यांचा दि.01.10.2026 रोजी पहाटे 2-30 वाजता फोन आला. तुमच्या बहिणीने आत्महत्या केली आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी चिंचवड येथे यावे असे सांगितले. मुलीच्या मृत्यूबाबत आपण वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ऋतुजा हिच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली आहे. माझ्या मुलीने छळास आत्महत्या केली असल्याचे भासवले जात असले तरी तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचा आपला संशय आहे, पोलिसांनी माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी, न्यायालयाने अटकेत असलेल्या तिच्या सासरच्या मंडळींना जामीन मंजूर करू नये व त्यांना कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी वानरे यांनी केली आहे.याबाबत आपण पोलीस अधीक्षक यांना भेटून सविस्तर निवेदन देणार असल्याचे वानरे यांनी म्हटले आहे.