जालना - शेतीच्या सातबाऱ्यावरील इतर अधिकारातील नावे दुरुस्त करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. भाऊसाहेब जगन्नाथ गवारे (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे. ते परतूर तहसील कार्यालयांतर्गत रोहिना (बु.) येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार हे खासगी नोकरी करतात. त्यांनी रोहिना खुर्द येथील एका शेतकऱ्याकडून गट क्रमांक १०४ मधील ४४ आर शेतजमीन खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार १०० रुपयांच्या बाँडवर इसारपावती करण्यात आली होती. मात्र, संबंधित शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर इतर अधिकारामध्ये असलेली नावे दुरुस्त करणे आवश्यक होते.
ही दुरुस्ती करून देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी भाऊसाहेब गवारे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
एसीबीकडे तक्रार; मागणीची पडताळणी
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ६ ऑक्टोबर रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.
त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी रात्री जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील आस्था हॉस्पिटलजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना भाऊसाहेब गवारे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सापळा पथकातील पोलीस अंमलदार गजानन धायवट, मनोहर भुतेकर, संदीप लहाने, शिवलिंग खुळे, गणेश चेके आणि विनोरकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.