मातृवत्सल आधारवड हरपला...

नाना पाटेकर हा भारतीय नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी कलाकार

Jalna Nayak    08-Oct-2026
Total Views |
 
मातृवत्सल आधारवड हरपला...
 
नाना पाटेकर हा भारतीय नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी कलाकार म्हणून ओळखल्या जात होता.. त्याने चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदी नाटकात, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करून आपल्या नैसर्गिक अभिनयाचा पाया भक्कम केला होता. भारदस्त आवाज, आक्रमक संवादफेक यातून जिवंत-वास्तववादी आणि भावनिक अभिनय करून अनेक भूमिका अजरामर केल्या... नानाने अभिनेता, दिग्दर्शक आणि समाजसेवक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
15 सप्टेंबर 2015 रोजी पुणे येथे नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी एकत्र येऊन नाम फाउंडेशन स्थापन केले. मराठवाडा,विदर्भ तसेच दुष्काळग्रस्त भागात आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी ते पुढे आले. सुरुवातीला नांदेड,परभणी, हिंगोली येथे जवळ पास 250 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 15000 रु. दिले. दैनंदिन कौटुंबिक गरजा भागवणाऱ्या वस्तू तसेच आरोग्यासाठी मदत करण्यात आली. 80 लक्षापासून सुरू झालेली मदत 6 ते 7 कोटी रुपयांपर्यंत गेली. महिलांना स्वयंरोजगाराचे शिक्षण देणे, शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण, शेतीसाठी पाझर तलाव करून देणे... वैजापूर मधील धोंदलगाव आणि वर्धा येथील आमला हे दोन गाव नामने दत्तक घेतले होते. वृक्षरोपण, दुष्काळ,महापूर आणि कोविड मध्ये नाम फाउंडेशनने अत्यंत महत्वपूर्ण मदत करून गरजवंताना मोठा आधार देण्याचे काम केले...
नाना हा जसा प्रतिभावान अभिनेते होता तितकेच तो संवेदनशील, माणुसकी जपणारे सच्चा माणूस होता...
त्यांच्या जाण्याने प्रत्येकाची भावना झालेली रईस फरोग यांनी आपल्या एका शेरमध्ये मांडली आहे...
लोग अच्छे है बहुत दिल में उतर जाते हैं
एक बुराई हैं तो बस ये है की मर जाते हैं
काही दिवसांपूर्वी नानांच्या नाट्यगुरु प्रसिद्ध दिग्दर्शिका स्व.विजया मेहता (नाना त्यांना आई मानत) यांचे निधन झाले त्यावेळी तो म्हणाला मी पुन्हा पोरका झालो...सगळे काही संपले
.. आणि आज सकाळी (8 ऑक्टोबर) भल्या पहाटे नाना आपल्याला सोडून गेल्याची दुखःद बातमी ऐकायला मिळाली...
हमीदाबाईची कोठी मधील शब्बे अलि आणि पुरुष मधील गुलाबराव या भूमिकेपासून त्याने अभिनयास सुरुवात केली. तर गमन चित्रपटात सहाय्यक कलाकार या भूमिकेत चित्रपट सृष्टीत त्याचा प्रवेश झाला... अंकुश, परिंदा, क्रांतिवीर, तिरंगा,अब तक छप्पन, अग्निसाक्षी, अंगार,अपहरण,वेलकम, खामोशी इ. एकापेक्षा एक सरस भूमिका साकारून रांगडा मराठी अभिनेता म्हणून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली.. धारधार आवाजातील संवाद, देहबोली, कधी विचित्र विक्षिप्तपणा, विराम घेऊन पुन्हा आवाजाची पट्टी वाढवून संवाद घेण्याच्या शैलीमुळे नाना प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवायचा... व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून जाण्याचे त्याचे खास तंत्र पुढील पिढीसाठी कायम प्रेरणादायी राहील... जेव्हा क्रांतिवीर या चित्रपटात नाना (प्रताप नारायण तिलक) म्हणतो...
ये हिंदू का खून ये मुसलमान का खून... बता इसमें मुसलमान का कौन सा, हिंदू का कौन सा? बताओ! जब खुदा ने, भगवान ने फर्क नहीं किया, तो तुम कौन होते हो फर्क करने वाले?
तेव्हा सगळे सभागृह निशब्द होत असे आणि तो संवाद जणू उपस्थित प्रत्येकाला उद्देशून होता असेच वाटत रहायचे.. यासाठी त्यांला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता...
नटसम्राट हा चित्रपट नानाच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरला. अनेकांनी आप्पा बेलवलकर ही भूमिका आपल्या क्षमतेने उभी केला...पण नानानी साकारलेला अप्पा मात्र एकमेवद्वितीय असाच ठरला... त्या चित्रपटातील एक्झिट जितकी हृदय पिळवटून टाकणारी होती त्यापेक्षा कैकपटीने आजची बातमी अविश्वसनीय आणि धक्का देणारी होती... नानांचा दिलखुलास स्वभाव,स्पष्टवक्तेपणा आणि निस्वार्थ भावनेनेने केलेलं सामाजिक काम आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील... नाना हा रुपेरी पडद्यावरील सामन्याचा महानायक होता... म्हणून तो नटापेक्षा माणूस म्हणून प्रचंड उंचीचा होता. आपल्या मुलाखती आणि भाषणात सांगत की, मी नायक होण्यासाठी चित्रपट सृष्टीत आलो नाही. तर सामन्याच्या मनातील भावना,दुःख आणि भ्रष्ट व्यवस्थेवर प्रहार करण्यासाठी कलाक्षेत्र निवडले आहे...परिवर्तनाच्या लढ्यासाठी नाटक किंवा चित्रपट एक प्रभावी माध्यम ठरू शकते हेच नानाच्या एकूण सिनेप्रवास, जीवनपटावरून लक्षात येते...
नानाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एकच भाव मनात ठेवू त्याची दुःखी कष्टी लोकांविषयी असलेली भावना, सामाजिक चळवळ आणि शेवटची इच्छा विचारता घेऊन आपल्या ओंजळीत मावेल तेवढे घेऊ आणि कृतज्ञ होऊन गरजवंताच्या कामी येऊ...
- रमेश काकासाहेब शिंदे (9422970896)
 
(लिखाणात नानाचा एकेरी उल्लेख हा त्याच्याविषयी जवळीक साधण्यासाठी वापरण्यात आला आहे...)