जालनाः पिस्तुले जप्त केली आठ अन् आरोपी सापडला एक
कदिम जालना पोलिसांची कारवाई, इतर आरोपी मात्र फरार
Jalna Nayak 09-Oct-2026
Total Views |

जालनाः शहरात पिस्तुले, तलवारी, चाकुंची संख्या आता मोजता येईल यापेक्षा पुढे गेली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सात ऑक्टोबर 2026 रोजी कदिम जालना पोलिस ठाण्याने छत्रपती संभाजीनगर मार्गावरील विशाल कॉर्नर परिसरात कारवाई करीत तब्बल 8 पिस्तुले, एक मोठा खंजीर, काडतुसे मिळून तब्बल सहा लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रत्यक्षात या सर्व कारवाईत एकच आरोपी सापडल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेऊन सांगण्यात आले.अजून चार आरोपींचा शोध सुरू असलयाचेही सांगण्यात आले. यामुळे एक तर दोन दिवसांनी कदिम पोलिसांनी या कारवाईबाबत माहिती समोर आणली. दोन दिवस कसे लागले, काय केले याची उत्तरे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने देऊन कारवाई कशी केली याबाबत वर्णन केले. प्रत्यक्षात मोठा शस्त्रांचा साठा सापडला असताना एकच आरोपी यात सापडावा याबाबत नवल आहे.एकूणच जालना शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांकडून कारवाई होत असली तरी त्यात हातचे राखून ठेवले जात आहे की काय अशी शंका उपस्थित होण्यास जागा आहे. काही मुद्दे गुप्त ठेवले जातात तो तपासाचा भाग असू शकतो यावर शंका घेण्याचे कारण नाही. पण अनेक कारवायांमध्ये थातूरमातूर कर्मकांड उरकले जात असल्याने शंकेचा परिघ वाढत आहे.