गल्हाटी धरणाचा आटलेला श्वास आणि जालना जिल्ह्यातील दुष्काळाचे दाहक वास्तव

केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

Jalna Nayak    09-Oct-2026
Total Views |
 
पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्व स्थिती जाणून घेतली.
 
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाची गंभीर दखल घेत केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने नुकतीच अंबड तालुक्यातील महत्त्वाच्या गल्हाटी धरणाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. धरणातील कोरडी पडलेली जमीन, करपलेली पिके आणि हाताला काम नसलेल्या ग्रामीण जनतेचे वास्तव या पथकासमोर आले आहे.यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्व स्थिती जाणून घेतली.
धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर खालावल्यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणीपुरवठा आणि सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणातील पाणी आटल्यामुळे त्यावर उपजीविका करणाऱ्या १०६ मच्छीमार कुटुंबांवर अक्षरशः बेरोजगारीची वेळ आली आहे.  धरण क्षेत्रालगतच्या पट्ट्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे उभी पिके करपली आहेत. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून डोळ्यांसमोर उभे पीक जळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान पथकाने शेतकऱ्यांच्या शेतात थांबून कापूस वेचणी करणाऱ्या महिलांशी थेट संवाद साधला. दुष्काळामुळे शेतीची कामे मिळेनाशी झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न महिलांसमोर उभा ठाकला आहे. पावसाअभावी शेतीचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आणि शेतमजुरांसमोर जगण्याचा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.
 
 
पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्व स्थिती जाणून घेतली.
 
या पाहणी दौऱ्यात कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. केंद्रीय पथकासोबत राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार सोमेश मोहिते, गटविकास अधिकारी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, पांडुरंग गटकळ व इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली असली, तरी या संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी शासनाकडून तातडीने शाश्वत मदत पॅकेज, कर्जमुक्ती आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्याची आर्त हाक आता अंबड तालुक्यातील जनता देत आहे.