श्री बालाजी महाराज यात्रा नियोजन सभेत विविध विषयांवर चर्चा

संस्थान आणि प्रशासन जबाबदारीने काम करणार

Jalna Nayak    09-Oct-2026
Total Views |
 
 श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
 
देऊळगाव राजा: ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्यानिमित्त आयोजित यात्रा समितीच्या सभेत वार्षिक उत्सव व यात्रेच्या नियोजनाचा विस्तृत आढावा घेण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. यावेळी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह राजे जाधव यांनी प्रास्ताविकात उत्सव कालावधीची व आतापर्यंत झालेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून श्री बालाजी संस्थान व जागावाटप समितीमार्फत भाविक, शेतकरी व व्यावसायिकांसाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवले जाणार आहेत. यात सर्वांसाठी अत्यंत अल्पदरात भोजनकक्ष, गोशाळा आणि गाढव बाजारातील गाढवांसाठी चारावाटप, यात्रेकरूंसाठी पाणपोई, तसेच बसस्थानक किंवा वाहनतळावरून मंदिरात जाण्यासाठी अल्पदरात इलेक्ट्रिक वाहनांची (इलेक्ट्रिक व्हेईकल) सोय केली जाणार आहे.या बैठकीस नगराध्यक्षा माधुरी शिंपणे, सर्व नगरसेवक, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) अर्जुन ठोसरे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी, मुख्याधिकारी अरुण मोकळ, सतिश कायंदे विद्युत व परिवहन विभागाचे अधिकारी, तसेच यात्रा समितीचे सदस्य व पत्रकार उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण अठरा मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) आणि यात्रा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच यात्रेच्या जागेवरील अतिक्रमण काढणे, व्यावसायिकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा, भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था, मोफत आरोग्य सेवा, स्वच्छतागृहे आणि पथदिवे सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला. अतिरिक्त एसटी बसेस सोडणे, लोकनाट्य मंडळांना परवानगी देणे, रात्री बारापर्यंत व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवण्याची अनुमती देणे आणि उत्सवाच्या दिवशी शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीत पत्रकार अर्जुनकुमार आंधळे, दादा जम्मन, गोविंदराव झोरे, विष्णू रामाने, व्यवहारे, गिरीश वाघमारे, सुरज हनुमंत आणि नवनाथ गोमधरे यांनी यात्रेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.विशेषतः, दुष्काळी परिस्थितीमुळे व्यावसायिकांना यात्रेतील जागा मोफत किंवा सवलतीच्या दरात वाटप करण्यासंदर्भात आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा सर्वसामान्य यात्रेकरूंना मिळण्याबाबत सर्वानुमते चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.