अंबड शहरात धाड; गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांची कारवाई

१४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Jalna Nayak    01-Nov-2026
Total Views |
 
पोलीस ठाणे अंबड
 
अंबड: अंबड शहरातील धनगर गल्लीकडे जाणाऱ्या रोडवरील एका तीन मजली घरात सुरू असलेल्या गोवंशीय जनावरांच्या  कत्तलखान्यावर अंबड पोलिसांनी रविवारी धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गोवंशीय जनावरांचे मांस, वाहने व इतर साहित्य असा एकूण १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी मुख्य आरोपीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास अंबड शहरातील धनगर गल्लीकडे जाणाऱ्या रोडवरील आरोपी हनीफ दादामियों कुरेशी याच्या तीन मजली घरात गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलीस उपनिरीक्षक तथा फिर्यादी आदिनाथ काशिनाथ ढाकणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
या कारवाईत आरोपी व त्याचे इतर साथीदार गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसून आले. तसेच, तीन जनावरांना खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था न करता अतिशय क्रुरपणे आणि अखूड दोरीने कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून कत्तल केलेले अंदाजे ५०० किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस (किंमत १,००,००० रु.), मांस कापण्याचे लाकडी ओंडके, कुऱ्हाडी, सुऱ्या, सत्तुर, वजन काटे, फ्रीज यांसह अनेक साहित्य जप्त केले. याशिवाय वाहतूक व कत्तलीसाठी वापरली जाणारी चारचाकी वाहने (टाटा एसी, तावेरा, स्विफ्ट कार, महिंद्रा स्कॉर्पिओ) आणि दोन मोटारसायकल असा विविध प्रकारचा एकूण १४,१०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल या प्रकरणी मुख्य आरोपी हनीफ दादामियों कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, अंबड) व इतर अज्ञात इसमांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलमान्वये, प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० आणि भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ३(५) नुसार पोलीस ठाणे अंबड येथे दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. म्हस्के हे करत आहेत.