जालना / सेवली :सेवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभू सावरगाव येथे एका वृद्ध सालगडीचा गळा आवळून खून करून अंगावरील चांदीचे दागिने लुटून नेणाऱ्या दोन अट्टल आरोपींना सेवली पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच जेरबंद केले आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला असून, त्यांच्याकडून ३२६ ग्रॅम वजनाचा लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास, शंभू सावरगाव येथील गजानन सहाणे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे पाटीलबा उर्फ बबन अप्पाराव पुरांत (वय ६६ वर्षे) हे बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच सेवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना नेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालामध्ये मयताचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्या अंगावरील चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आल्याने, सेवली पोलीस ठाण्यात खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साबळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, डॉग स्कॉड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण व डम्प डेटाची छाननी करण्यात आली. यादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी पवन रमेश जाधव (वय २६ वर्षे, रा. शंभू सावरगाव, ता. व जि. जालना) संदेश श्रीकृष्ण राठोड (वय २४ वर्षे, रा. शंभू सावरगाव, ता. व जि. जालना) आरोपींकडून पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चांदीचे कडे (वजन २५० ग्रॅम), चांदीची चैन (वजन ७० ग्रॅम), चांदीची अंगठी (वजन ६ ग्रॅम)एकूण ३२६ ग्रॅम वजनाचा चांदीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदर महत्त्वाची कामगिरी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साबळे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख पोलीस अमंलदार संतोष चव्हाण, सुभाष राठोड, राहुल पाईकराव, तुकाराम राठोड, राजु राठोड, प्रल्हाद चिरफरे, पांडूरंग निंबाळकर, संजय उघडे, विजय जुबंडे, सुनिल जाधव, गणेश खार्डे, अशोक डोईफोडे, शुभम बडूगे, अशोक दुभळकर, निखील शिलवंत, संदीप घोडके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संभाजी तनपुरे, रामप्रसाद पहुरे, लक्ष्मीकांत आडेप, गोपाल गोशीक, शिवप्रसाद एखंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.