उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य : सतीश घाटगे

Jalna Nayak    10-Nov-2026
Total Views |
 
सतीश घाटगे
 
 
सतीश घाटगे यांनी शेतकरी, ऊसतोड कामगारांसोबत साजरा केला दिवाळी पाडवा
 
घनसावंगी : दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून दिवाळी पाडवा सणाचा उत्सव न करता शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका घेत समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी शेतकरी, ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी पाडवा साजरा केला. दीपावली पाडव्याचे औचित्य साधून समृद्धी साखर कारखाना येथे त्यांनी अंबड, घनसावंगी व जालना तालुक्यातील शेतकऱ्यांची भट घेऊन संवाद साधला. त्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी अंबड, घनसावंगी आणि जालना तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते, सहकारी तसेच भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊस तोडणी, पाणी टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, जळणारा ऊस तसेच कर्जमाफी आणि नवीन पीककर्ज यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर यावेळी सतीश घाटगे यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांकडून त्यांच्या विविध प्रश्ना संदर्भात निवेदने स्वीकारली. शेतकऱ्यांनी दुष्काळी संकटात खचून जाऊ नये, या संकटात मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास घाटगे पाटील यांनी दिला. शेतकरी व जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ऊसतोड कामगार व बालकांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा खरा आनंद हा कष्टकऱ्यांसोबत आनंद वाटून घेण्यात असतो, या भावनेतून सतीश घाटगे पाटील यांच्या पुढाकाराने कारखान्यावरील ऊसतोड कामगारांसोबत दीपावली पाडवा साजरा केला. साखर कारखान्याच्या गाळप हंगामात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ऊसतोड कामगार बांधव, माता-भगिनी आणि त्यांच्या चिमुकल्या मुलांना नवीन कपडे व दिवाळीचा फराळ वाटप केला. दुष्काळी संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना घरदार सोडून उसतोड करणाऱ्या कामगारांप्रती सतीश घाटगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.