खडकपूर्णाचे पाणी विरेगाव संपात दाखल; भोकरदनकरांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या दिशेने!

आमदार संतोष दानवेंच्या हस्ते जलपूजन; वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना दिलासा

Jalna Nayak    10-Nov-2026
Total Views |

खडकपूर्णा धरणाचे पाणी विरेगाव येथील मुख्य संप (पंपिंग स्टेशन) मध्ये दाखल
 
 
भोकरदन : शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले असून, अखेर खडकपूर्णा धरणाचे पाणी विरेगाव येथील मुख्य संप (पंपिंग स्टेशन) मध्ये दाखल झाले. रविवार (दि.९) रोजी महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते पाण्याचे विधिवत जलपूजन करण्यात आले. यामुळे वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भोकरदनकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खडकपूर्णाचे पाणी विरेगाव संपात दाखल होताच उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार संतोष दानवे म्हणाले की, भोकरदन शहराला मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा माझा ठाम संकल्प होता. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा हा प्रयत्न आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून देत प्रशासकीय पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले.
याप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे, नगराध्यक्ष नगराध्यक्ष सौ.समरीननाज मिर्झा , उपनगराध्यक्ष सौ.सुरेखा जाधव, नगरसेवक दिपक मोरे, सौ.चंचालाबाई पाथरे, शफीक पठाण, चंद्रकांत पगारे, सुमित थारेवाल, रणविरसिंह देशमुख, राजेंद्र देशमुख, रमेश जाधव, शंकर सपकाळ, रामदास पाथरे, विनोद मिरकर, रमेश बिरसोने यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
भोकरदनच्या पाणीप्रश्नात पक्षीय राजकारण बाजूला; भाजपचे आमदार संतोष दानवेंचा पुढाकार चर्चेत!
भोकरदन नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाची सत्ता असताना भाजपचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी शहराच्या पाणीप्रश्नात लक्ष घालून खडकपूर्णा धरणाचे पाणी भोकरदनपर्यंत आणण्यासाठी पुढाकार घेतला. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाकडून करून घेतलेल्या प्रयत्नांमुळे अखेर खडकपूर्णाचे पाणी विरेगाव येथील संपात दाखल झाले आहे. पक्षीय राजकारणापेक्षा शहराचा पाणीप्रश्न महत्त्वाचा मानून केलेल्या या प्रयत्नांची शहरात चर्चा होत असून, आमदार दानवे यांच्या भूमिकेचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.