उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे आग्रही मागणी
जालना, प्रतिनिधी : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जालना जिल्ह्याचा समावेश करून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली. जालना दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांची भेट घेऊन घुगे यांनी यासंदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख भास्करराव आंबेकर, अनिरुद्ध खोतकर, पंडितराव भुतेकर, खोतकर, ए जे पाटील बोराडे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, नगरसेविका दर्शनाताई खोतकर, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर खोतकर उपस्थित होते.
मराठवाड्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांचा समावेश प्रस्तावित असताना जालना जिल्ह्याचाही समावेश करणे आवश्यक असल्याचे घुगे यांनी निवेदनात म्हटले आहे.
जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा या आठही तालुक्यांतील अनेक गावांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो, तर पाण्याअभावी शेतीचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे जिल्ह्याचा वॉटर ग्रीडमध्ये समावेश करून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अप्पर दूधना, सोमठाणा, राजेवाडी, वाल्हा, आन्वी, घानेवाडी, जामवाडी, पिरकल्याण, सुखापुरी यांसह विविध धरणे व जलसाठ्यांचा प्रकल्पाशी तांत्रिकदृष्ट्या समन्वय साधण्याची शक्यता तपासावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच गोदावरी, दूधना, सुखना, भोरडी, धामना, कुंडलिका आणि सीना या नद्यांच्या जलसंपत्तीचे एकात्मिक नियोजन करून नदीजोड व जलसाठे पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावाला वर्षभर नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, शेतीसाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी, आंतरखोरे जलवाटप आणि उपलब्ध धरणांतील पाण्याचा अभ्यास करून आवश्यक पाणी आरक्षित करावे, तसेच जिल्ह्याचा स्वतंत्र जलआराखडा तयार करावा, अशा सात प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यासाठी जलसंपदा, मृद व जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नियुक्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जालना जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला जिल्हा आहे. पाण्याच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड हा केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित न राहता शेतीच्या सिंचनासाठीही उपयुक्त ठरणारा व्यापक जलविकास प्रकल्प व्हावा, अशी भूमिका भाऊसाहेब घुगे यांनी मांडली. जालना जिल्ह्याच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नाची दखल घेऊन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली.