यंदाही फटाक्यांचीच दिवाळी

Jalna Nayak    11-Nov-2026
Total Views |
 
फटाक्यांचीच दिवाळी
 
दिवाळी खरेतर प्रकाशाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण. ४ दिवस चालणाऱ्या या सणाची सिद्धता एक महिना आधीपासून सुरु होते. दिवाळी सणाची आतुरता बच्चे कंपनीपासून मोठ्यांनाही असते. यानिमित्ताने संपूर्ण घराची साफसफाई होते, घराला रंगरंगोटी होते. जुने पडीक सामान बाहेर काढले जाते. नवनवीन वस्तू घरात येतात, नवीन कपडे शिवले जातात, दिवाळीनिमित्त घराला रोषणाई केली जाते, दाराजवळ आकाशकंदील लावला जातो, दरवाज्यापुढील रांगोळी आणि पणत्यांची मांडणी घराच्या सौंदर्यात आणखी भर टाकते. सुगंधी आणि रुचकर फराळाची मेजवानी घरातील प्रत्येकाला खुलवते. आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा दिल्या जातात, बच्चे कंपनीला फटाके वाजवायला मिळतात. पूर्वीच्या काळी मिळणारे फटाके हे मर्यादित आवाजाचे आणि मर्यादित धुराचे असायचे. आता मात्र फटाक्यांमध्येही नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. बच्चे कंपनीसह मोठ्यांनी फोडायचे फटाके पुष्कळ प्रमाणात बाजारात येऊ लागले आहेत, ज्यामुळे लहानांसोबत तरुण मंडळीही मोठ्या प्रमाणात फटाके फोडताना दिसतात. परिणामी फटाके फोडण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमालीचे वाढले आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळीतील अन्य प्रथांचे महत्व कमी होऊन दिवाळी ही केवळ फटाक्यांची दिवाळी झाली आहे. फटाक्यांचे कानठळ्या बसवणारे आवाज, धुराचे लोट, आगीच्या दुर्घटना आणि निष्पाप जीवांची होणारी हानी हे दिवाळीचे विदारक वास्तव बनत चालले आहे.
मुंबईत दिवाळीच्या दिवशी एकूण १४२ अग्निशमन दलाचे कॉल आले. त्यापैकी १३७ आगी फटाक्यांमुळे लागल्याचे अग्निशमन विभागाच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले. ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईत फटाक्यांशी संबंधित सुमारे २०० आगींची नोंद झाली. डोंगरी परिसरात अनेक दुकाने, गॅरेज आणि झोपड्यांना भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला नऊ तासांहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले. कुर्ला येथील सनराइज इस्टेटमधील गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनांमुळे मुंबई अग्निशमन दलावर प्रचंड ताण आला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे लागलेल्या आगींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवी मुंबईत दिवाळीच्या दोन दिवसांत ६२ आगींची नोंद झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात ७० आगीच्या घटना घडल्या. त्यापैकी ६८ घटना फटाक्यांशी संबंधित होत्या. मीरा-भाईंदरमध्ये तीन दिवसांत १३७ आगींची नोंद झाली. वसई-विरारमध्ये ५५ आगीच्या घटना घडल्या. मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ३९० आगींच्या घटना नोंदवल्या गेल्याचे वृत्त आहे. या घटनांमध्ये काही ठिकाणी इमारती, दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले. पुण्यात यंदा फटाक्यांमुळे आग लागण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली. नागपूरमध्ये फटाक्यांमुळे १०० हुन अधिक नागरिक जखमी झाले असून त्यापैकी ३५ जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. दिल्लीत एका १० वर्षाच्या मुलाच्या पोटात फटाक्यातील रॉकेट घुसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजस्थानमधील पाली येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागून दोघांचा मृत्यू झाला. तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून २३ कामगारांचा मृत्यू झाला. तर गुजरातमधील कर्णावती येथील एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन ९ कामगारांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील देवास येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले.
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्बंध घातले आहेत. विशेषतः दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने फटाक्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत आणि वापरापासून वेळेच्या मर्यादेपर्यंत विविध बाबींचे नियमन केले. यंदा २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी केवळ प्रमाणित हरित फटाके सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेत फोडण्याची परवानगी देण्यात आली. रुग्णालये, वृद्धाश्रम आणि अधिसूचित शांतता क्षेत्रांच्या ३०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली. बेरियमयुक्त आणि मान्यताप्राप्त नसलेल्या फटाक्यांवरही निर्बंध घालण्यात आले. ९ नोव्हेंबरपासून पुन्हा संपूर्ण बंदी लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या भूमिकेमागे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक सुरक्षितता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश कागदावर राहून प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसेल, तर अशा निर्बंधांचा अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. मुंबईतील दुर्घटनांनंतर प्रशासनाने २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हे निर्बंध ८ जानेवारी २०२७ पर्यंत वाढवण्यात आले आहेत. तीन मोठ्या आगींच्या घटनांनंतर घेतलेला हा निर्णय परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करतो.
दिवाळी खरेतर नातेवाईकांसोबत एकत्र साजरा करण्याचा सण; मात्र फटाक्यांचा जीवघेणा धूर आणि आवाज नको म्हणून शहरातील श्वसनविकार, हृदय विकार असणारे अनेक जण दिवाळीच्या आधीच गावी किंवा शहराबाहेर मित्रमंडळींकडे, अन्य नातेवाईकांकडे काही दिवसांसाठी राहायला जातात. जे इथे आपल्या नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी थांबतात त्यांना फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जीव नकोसा होऊन जातो. गर्भवती स्त्रिया, मनोरुग्ण यांनाही फटाक्यांच्या आवाजाचा आणि विषारी वायूचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कुत्रे, मांजरी यांसारखे पाळीव प्राणी, पक्षी यांच्या आरोग्यावरही फटाक्यांचा विपरीत परिणाम होतो ज्यामुळे ते भयभीत होऊन सैरावैरा धावू लागतात. भीतीमुळे अनेकदा हे प्राणी आणि पक्षी जीवसुद्धा गमावतात. सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी नावाचे एक गाव आहे. या गावातील शेतकरी किरण जाधव यांच्या घरी पोमेरेनियन जातीचा भालू नामक पाळीव कुत्रा होता. . जाधव यांच्यासह संपूर्ण गावाला भालूचा लळा लागला होता. १० वर्षांपूर्वी दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाला घाबरून भालूने जीव सोडला. भालूच्या मृत्यूमुळे गावातील ४५० नागरिक हळहळले. भालूच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांनी गावात फटाके बंदीचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत दिवाळीच्या काळात गावातील कोणीच फटाके वाजवत नाहीत. परंपरागत पद्धतीनुसार दिवाळी साजरी करतात. भालूच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामस्थांनी गावात १० हजार झाडे लावली. त्यामुळे एकेकाळी ओसाड असलेले हे गाव आज हिरवळीने बहरले आहे. जी बाब चिंचणीसारख्या छोट्याशा गावातील लोकांच्या लक्षात आली ती शहरातील सुशिक्षित लोकांच्या केव्हा लक्षात येणार ?
वास्तविकत: दिवाळी हा दिव्यांचा सण. तिमिराकडून तेजाकडे जाण्याची शिकवण देणारा सण; मात्र दिवाळीतील जीवघेण्या फटाक्यांमुळे आपला प्रवास तेजाकडून तिमिराकडे चालला आहे कि काय असे वाटू लागते. दिवाळी आणि फटाक्यांचा काहीच संबंध नाही. फटाक्यांची निर्मिती केवळ आतषबाजीसाठी करण्यासाठी करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात आतषबाजी करावी असा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथांत अथवा धर्मशास्त्रात नाही, मग दिवाळीसारख्या पवित्र सणात ही प्रदूषणाची खैरात कशासाठी ? फटाक्यांमुळे क्षणिक सुख मिळते मात्र त्यापासून होणारे नुकसान कैकपटीने अधिक असते. केवळ दिवाळीच्या काळात अब्जोवधी रुपयांच्या फटाक्यांचा निव्वळ धूर होतो. आज संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करत आहे. उन्हाळ्यात राज्यात किती भीषण परिस्थिती ओढवेल याची कल्पनाही करता येत नाही. अशा परिस्थिती फटाके फोडण्यात आणि त्यापासून होणारे नुकसान निस्तरण्यात अब्जोवधी रुपये खर्च होत असतील तर ते राज्याला नक्कीच परवडणारे नाही. ज्या गोष्टी धर्मशास्त्रात नाहीत आणि जर त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडणार असेल तर अशा बाबींवर बंदी आणणेच योग्य आहे. यंदा देशातील हवेची गुणवत्ता कमालीची बिघडल्याने अनेक राज्यांनी फटाके फोडण्यावर बंदी घातली तर काही राज्यांनी केवळ हरित फटाके फोडण्यास अनुमती दिली. दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांमुळे होणारी वित्त आणि जीवित हानी, फटाक्यांच्या बाबतीत न्यायालयाला करावा लागणार हस्तक्षेप, या दिवसांत प्रशासनावर पडणारा अधिक भार या सर्व बाबी लक्षात घेऊन दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यावर केंद्र सरकारने देश पातळीवर बंदी आणायला हवी !