जालन्याच्या ₹१२४६ कोटींच्या समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी अर्जुन खोतकरांचा आग्रही पाठपुरावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तत्त्वतः मान्यतेचे आश्वासन!

Jalna Nayak    12-Nov-2026
Total Views |

अर्जुन खोतकरांची १० टीएमसी पाण्याची ऐतिहासिक मागणी;
 
अंबडमार्गे नव्हे, जालन्यासाठी स्वतंत्र समांतर जलवाहिनी; सन २०६० पर्यंतच्या ७.७३ लाख लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्याचे दीर्घकालीन नियोजन!
 
जालना : जालना शहराचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शिवसेना उपनेते, माजी मंत्री तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शासनस्तरावर सुरू केलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित सुमारे ₹१२४६ कोटी खर्चाच्या स्वतंत्र समांतर पाणीपुरवठा योजनेला तत्त्वतः मान्यता देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे आमदार खोतकर यांनी सांगितले. मौजपुरी येथील दौऱ्यादरम्यान खोतकर यांनी केलेल्या आग्रही मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोमवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना तालुक्यातील मौजपुरी येथील रामेश्वरी महादेव संस्थान येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तसेच त्यांना 'आनंदाचा शिधा' देऊन दिलासा देण्यासाठी आले होते. या दौऱ्यादरम्यान आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी जालना शहराच्या वाढत्या पाणीटंचाईचा आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडला.
जालना शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, विस्तारणाऱ्या नवीन वसाहती, औद्योगिकीकरण आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खोतकर यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन योजनेला तत्त्वतः मान्यता देण्याचे आश्वासन दिले व संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खोतकर यांनी दिली.
सन २०६० पर्यंतच्या लोकसंख्येचे नियोजन; जालन्याच्या भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना
जालना महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक अहवालानुसार सन २०६० पर्यंत जालना शहराची अंदाजित लोकसंख्या सुमारे ७ लाख ७३ हजारांवर पोहोचण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पुढील अनेक दशकांची पाण्याची गरज विचारात घेऊन या स्वतंत्र समांतर पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहराचा विस्तार, नवीन निवासी वसाहती, औद्योगिक विकास आणि भविष्यातील नागरी सुविधांची आवश्यकता लक्षात घेता ही योजना जालन्याच्या दीर्घकालीन व शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
अंबडमार्गे नव्हे, जालन्यासाठी स्वतंत्र समांतर जलवाहिनी!
या प्रस्तावित योजनेबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. नवीन समांतर पाणीपुरवठा योजना ही अंबडमार्गे न आणता जालना शहरासाठी स्वतंत्र स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जालना शहराची सध्याची आणि भविष्यातील पाण्याची गरज विचारात घेऊन स्वतंत्र जलवाहिनी व आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मौजपुरीतील मागणीनंतर मंत्रालयीन स्तरावर तातडीने पाठपुरावा
मौजपुरी येथील चर्चेनंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची लेखी मागणी केली आहे.
या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जालना महानगरपालिकेचे आयुक्त, शहर अभियंता, पाणीपुरवठा अभियंता तसेच वित्त विभाग व संबंधित मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयीन दालनात लवकरच या विषयावर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
₹१२४६ कोटींच्या योजनेत आधुनिक पाणीपुरवठा व्यवस्था
जालना महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या तांत्रिक खर्चपत्रकानुसार सुमारे ₹१२४६ कोटींच्या या योजनेमध्ये स्वतंत्र मुख्य जलवाहिनी, नवीन जलउपसा व्यवस्था, जलशुद्धीकरण प्रकल्प, जलसाठवण टाक्या, अत्याधुनिक पंपिंग यंत्रणा तसेच शहरातील विविध भागांमध्ये विस्तारित जलवितरण व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे.
 
."जालना शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र समांतर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे अत्यावश्यक आहे. ही योजना अंबडमार्गे न आणता जालना शहरासाठी स्वतंत्रपणे राबविण्याची आमची भूमिका आहे. मौजपुरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे याबाबत आग्रही मागणी केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तत्त्वतः मान्यतेचे आश्वासन दिले व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. या योजनेला आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळवून प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार आहे. जालनेकरांना नियमित, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे, हाच आमचा संकल्प आहे."
— आमदार अर्जुनराव खोतकर