आजच्या काळात फटाके हा आपल्या सण-उत्सवांचा आणि आनंदाचा एक भाग मानला जात असला, तरी याउलट त्याच्या निर्मितीमागील भीषण वास्तव अत्यंत विदारक आहे. 'फटाक्यांचे कारखाने म्हणजे रोजगाराचे साधन की मृत्यूचे सापळे?' हा प्रश्न आज गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि जीवितहानी जगजाहीर असताना, त्यावर बंदी घालण्याच्या प्रत्येक प्रयत्नावर दोन मुख्य युक्तिवाद केले जातात: एक धार्मिक भावनांचा आणि दुसरा कामगारांच्या रोजगाराचा.
मुळात, कोणत्याही धर्मग्रंथात किंवा शास्त्रात फटाके फोडण्याचा उल्लेख आढळत नाही. सर्वच धर्मांच्या आणि पंथांच्या उत्सवांमध्ये फटाके फोडले जातात. दिवाळी या पवित्र सणाचा आणि फटाक्यांचा तिळमात्र संबंध नसून, ती आपल्या संस्कृतीत शिरलेली एक अनिष्ट परंपरा आहे. त्यामुळे फटाक्यांवर बंदी आणणे हा धार्मिक भावना दुखावण्याचा विषय अजिबात असू शकत नाही.
दुसरा कळीचा मुद्दा म्हणजे कामगारांचा रोजगार. फटाक्यांच्या कारखान्यांवर बंदी आणल्यास हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, असे मानले जाते. परंतु, काळाच्या ओघात अनेक उद्योग बंद झाले आणि त्या क्षेत्रातील लोकांनी रोजगाराची नवीन साधने शोधून आपला संसार यशस्वीपणे चालवला. देशात संगणक आणि डिजिटल क्रांती आली किंवा आज जेव्हा एआय (AI) चा सर्वत्र शिरकाव होत आहे, तेव्हाही रोजगाराचे नवे मार्ग खुले झाले आहेत. त्यामुळे रोजगाराचे कारण देऊन मानवी जीवांशी खेळणारे हे उद्योग चालू ठेवणे योग्य नाही.
फटाक्यांच्या कारखान्यांमधील असुरक्षितता आणि निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या दुर्घटना अत्यंत भयानक आहेत. यंदाच्या (२०२६ च्या) सुरुवातीलाच देशातील विविध भागांत भीषण दुर्घटना घडल्या. १६ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील भिवाडी येथे, २८ फेब्रुवारीला आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे सूर्या श्री फायरवर्क्समध्ये, २२ एप्रिलला पालघरमधील वाडा येथे, १४ मे रोजी मध्य प्रदेशातील देवासमध्ये, १८ जुलै रोजी गुजरातमधील कर्णावतीमध्ये आणि १९ एप्रिलला तामिळनाडूतील विरुधुनगर येथे झालेल्या स्फोटांमध्ये शेकडो निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये अनेक महिलांचाही समावेश होता. या दुर्घटनांमध्ये जिवंत जळालेले कामगार आणि जखमी झालेल्यांचे दुःख शब्दांत मांडता येत नाही.
या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावरही अत्यंत घातक परिणाम होतात. गंधक (सल्फर), पोटॅशियम नायट्रेट आणि ॲल्युमिनियम पावडरचे सूक्ष्म कण सतत श्वासावाटे फुफ्फुसात गेल्यामुळे दमा, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसांना इजा (लंग स्कारिंग) होण्याचा धोका असतो. रसायनांच्या संपर्काने त्वचेचे आजार आणि कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. तसेच शिसे, मॅंगनीज आणि क्रोमियमसारखे जड धातू शरीरात साचल्यामुळे मज्जासंस्थेचे आजार आणि हृदयविकार बळावतात. थोडक्यात सांगायचे तर, फटाक्यांमुळे मिळणारा क्षणिक आनंद आणि रोषणाई ही या मानवी मुल्यांच्या आणि जीवितांच्या किंमतीवर अत्यंत क्षुल्लक ठरते. मानवी जीवनाची अमूल्य किंमत लक्षात घेता, या मृत्यूच्या सापळ्यांना वेळीच आळा घालणे गरज बनली आहे.