परतूर (प्रतिनिधी):लोभाचे भूत मानगुटीवर बसले की माणूस कसा विवेक गमावतो, याचेच एक उदाहरण परतूर तालुक्यात उघडकीस आले आहे. गुप्तधन मिळविण्याच्या हव्यासापोटी टाकळखोरा-माहोरा परिसरातील एका शेतात मध्यरात्री मांत्रिकामार्फत सुरू असलेला अघोरी विधी परतूर पोलिसांनी छापा टाकून उधळून लावला आहे. या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री साधारण १२:५० वाजण्याच्या सुमारास परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळखोरा-माहोरा परिसरातील एका शेतात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, काही व्यक्ती अंधारात अत्यंत संशयास्पदरीत्या विविध प्रकारच्या पूजा व अघोरी विधी करताना आढळल्या. पोलिसांनी तात्काळ सर्व संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळावरून पोलिसांनी पूजेचे आणि विधीचे साहित्य जप्त केले, ज्यामध्ये प्रामुख्याने लिंबू, हळद, कुंकू, सुपारी खोदकामासाठी वापरण्यात येणारे छन्नी, हातोडा आणि कुदळयांसारख्या साहित्याचा समावेश होता.या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत म्हणजेच 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियमानुसार' संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे."गुप्तधन मिळवून देण्याचे किंवा चमत्काराचे आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींपासून सर्वांनी सावध राहावे. अशा प्रकारची कोणतीही माहिती किंवा संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ परतूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा," असे आवाहन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी रोहित कलमदाणे यांनी केले आहे. सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उद्धव चव्हाण, नंदू खंदारे, पोलीस अंमलदार अशोक गाढवे, सुरेश राठोड, महेश कोरडे, अतुल खंदारे, सुनील पवार आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्या पथकाने पार पाडली.