बदनापूरच्या बालाजी मंदिरात भाजपची जाहीर सभा; एसआयआर, संविधान, राष्ट्रीय एकात्मता आणि विकसित भारताच्या संकल्पनेवर मार्गदर्शन
बदनापूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने बदनापूर येथील बालाजी मंदिरात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या विषयावर आयोजित सभेत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशातील सद्य राजकीय परिस्थिती, संविधान, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) आणि केंद्र सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
देशाच्या विकासाच्या मुद्द्यांऐवजी जनतेची दिशाभूल करणारे राजकारण केले जात असल्याची टीका करत राणे म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून खोटे नेरेटिव्ह निर्माण केले जात आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही दुटप्पी भूमिका आहे. संविधान आणि लोकशाहीची भाषा करणाऱ्यांनी संविधानाचा इतिहासही प्रामाणिकपणे मांडला पाहिजे. अशा दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला इतिहास, संविधान आणि वस्तुस्थितीच्या आधारे उत्तर देणे आवश्यक आहे. भाजपाचे राजकारण सत्तेसाठी नसून राष्ट्रनिर्माणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख करताना त्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा संदर्भ दिला. स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश, एक विधान, एक प्रधान, एक निशाण’ या संकल्पनेसाठी संघर्ष केला. त्यांच्या बलिदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षितता हे भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
युवक, महिला आणि क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत बोलताना राणे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. युवकांच्या कल्पनांना व्यवसाय व रोजगाराच्या संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठी स्टार्टअपसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असून महिला शक्ती ही विकसित भारताची ताकद आहे. गावागावांतून गुणवंत खेळाडू घडवून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय हा भारतीयांच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा विषय असल्याचे सांगत अनेक दशकांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून हा प्रश्न मार्गी लागला. २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा संपन्न होणे हा भारतीय सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपाची भूमिका कोणत्याही धर्माचा द्वेष करण्याची नसून सर्व धर्मांचा सन्मान आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्याची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एसआयआर प्रक्रियेत बूथस्तरावर दक्ष राहण्याचे आवाहन
विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर मार्गदर्शन करताना पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहणे, नव्या पात्र मतदारांची नोंदणी आणि मतदार यादीतील नोंदींची पडताळणी यासाठी कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर सक्रियपणे काम करावे, असे आवाहन राणे यांनी केले. कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जालना जिल्हाध्यक्ष ग्रामीण तथा आमदार नारायण कुचे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, प्रदेश चिटणीस प्रवीण घुगे, नांदेड उत्तर जिल्हा प्रभारी किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, हरिचंद्र बाबा शिंदे, बदनापूर नगरपंचायत नगराध्यक्ष संतोष पवार, वसंतराव जगताप, नगरपंचायत गटनेते बाबासाहेब कऱ्हाळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान बारगाजे, बदनापूर मंडळ अध्यक्ष भगवान मात्रे, अंबड मंडळ अध्यक्ष प्रदीप पवार, शेख समीर, वसीम सय्यद यांच्यासह बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत आगामी संघटनात्मक कामकाज, बूथस्तरावरील नियोजन आणि एसआयआर प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांची भूमिका यावरही चर्चा करण्यात आली.