जागतिक न्यूमोनिया दिन: १२ नोव्हेंबर
जालना : वेळेवर निदान व योग्य उपचारामुळे न्यूमोनियावर मात करणे शक्य असल्याचे डॉ. जयश्री भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात "जागतिक न्यूमोनिया दिन" (World Pneumonia Day) साजरा येत असून, न्यूमोनियासारख्या गंभीर आजाराविषयी समाजात जनजागृती व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. न्यूमोनिया हा विशेषतः ५ वर्षाखालील बालकांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण असणारा आजार असला, तरी योग्य काळजी आणि लसीकरणामुळे तो पूर्णपणे टाळता येऊ शकतो.
न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा संसर्ग असून जिवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होतो. सर्दी, खोकला, वेगाने श्वास घेणे, छातीत ओढ किंवा श्वास घेताना घरघर आवाज येणे ही न्यूमोनियाची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता नजीकच्या शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
रोग निदान : छातीचा एक्स रे, सीटी स्कॅन, पल्स ऑक्सिमीटर.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :
लसीकरण: बालकांना वेळेवर सर्व नियमित लसीकरण (उदा. PCV - Pneumococcal Conjugate Vaccine) करून घेणे.
स्तनपान: नवजात बालकांना जन्मानंतर पहिले सहा महिने केवळ आईचे दूध देणे, ज्यामुळे बालकांची प्रतिकारशक्ती वाढते.
स्वच्छता: हात वारंवार साबणाने धुणे आणि घरातील परिसर स्वच्छ ठेवणे.
हवा प्रदूषण टाळणे: घरामध्ये धूर होणार नाही याची काळजी घेणे आणि तंबाखूच्या धुरापासून मुलांना दूर ठेवणे.
"वेळेवर निदान आणि योग्य उपचारामुळे न्यूमोनियावर मात करता येते. थोडीशी सतर्कता आपल्या बालकांचे प्राण वाचवू शकते," असा संदेश जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने देण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क १०४