जालना-जायकवाडी समांतर पाणीपुरवठा योजना श्रेयावरून पेटला वाद; माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा विद्यमान आमदारांवर घणाघात

Jalna Nayak    13-Nov-2026
Total Views |
 
कैलास गोरंटयाल
 
गोरंट्याल यांचे खोतकरांना आव्हान
 
जालना (प्रतिनिधी) :जालना ते जायकवाडी यादरम्यान प्रस्तावित असलेल्या सुमारे १२०० कोटी रुपयांच्या समांतर पाणीपुरवठा योजनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी शुक्रवारी (दि. १३) एका पत्रकार परिषदेत, विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "या योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही अहोरात्र पाठपुरावा केला असून, कुंभकर्णी झोप काढणाऱ्या विद्यमान आमदारांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
 
यावेळी गोरंट्याल म्हणाले की, जालना शहराची सन २०६० मधील लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा डीपीआर (DPR) 'एकॅम व्हेंचर्स' या कंपनीकडून तयार करून घेण्यात आला आहे. ही योजना जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्यातून होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैठण व अंबड येथील केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी व्हीसीद्वारे झालेल्या बैठकीत काही त्रुटींमुळे हा प्रस्ताव नामंजूर झाला होता. मात्र, त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२६ रोजी माजी आमदार गोरंटयाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नव्याने शिफारस करण्याची विनंती केल्याचे त्यांनी कागदपत्रांसह स्पष्ट केले. या पाठपुराव्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायणराव कुचे, आ. संतोष दानवे व भास्कर दानवे आदींचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
 
पत्रकार परिषदेस महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, पूनम स्वामी, महावीर ढक्का, रमेश गौरक्षक आदी उपस्थित होते.
 
समांतर योजनेची ठळक वैशिष्ट्ये
निधी व मार्ग: वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून अंदाजे १२०० कोटी रुपये खर्च. जायकवाडी ते शिरनेर टेकडी मार्गे जालना असा सुमारे १०० किलोमीटरचा जलवाहिनी मार्ग.
पाणीपुरवठा: या नवीन योजनेद्वारे शहराला दररोज ६३ एमएलडी पाणी मिळणार असून, जुन्या आणि नवीन योजनेतून मिळून भविष्यात एकूण ११५ एमएलडी पाणी शहरासाठी उपलब्ध होईल.
 
मूलभूत सुविधांसाठी ३० कोटींचा निधी:याच पत्रकार परिषदेत बोलताना कैलास गोरंटयाल यांनी जालना शहरासाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली. जालना महापालिकेला मूलभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून लवकरच ३० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या शंभर टक्के राज्य शासनाच्या निधीतून शहरात रस्ते, पथदिवे आणि नाले यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत.
 
गोरंट्याल यांचे खोतकरांना आव्हान
"तुम्हाला जर नवीन काही मंजूर करायचे असेल, तर बाराशे नाही तर चौदाशे कोटी रुपयांची योजना आणून दाखवा, आम्ही त्याचे स्वागतच करू," असे खुले आव्हान देत गोरंटयाल यांनी विरोधकांना राजकीय वर्तुळात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.