देऊळगाव राजा (जि. बुलढाणा): समृद्धी महामार्गावर दुसरबीडनजीक तळेगाव परिसरामध्ये एक भीषण साखळी अपघात घडला. रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सुमारे २२ ते २५ हून अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३२१ किलोमीटरजवळ सकाळी एक टँकर पलटी झाला होता. टँकरमधील भुकटी रस्त्यावर पसरल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती. तसेच, टँकर हटवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक अडथळे (बॅरिकेट्स) लावले होते. त्यामुळे महामार्गावर मागून वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. प्रवासी आपापल्या वाहनांत बसून रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत असतानाच, लोखंडी पट्ट्या घेऊन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने (क्र. एमएच ४० बीएल ४९१४) मागून उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगेला थेट धडक दिली. या भीषण पहिल्या धडकेमुळे पुढील वाहने वेगाने एकमेकांवर आदळली आणि धडकेची मोठी मालिकाच सुरू झाली. या साखळी अपघातात ७ ते ८ वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सकाळच्या टँकर अपघातामुळे आधीच खोळंबलेल्या वाहतुकीला या दुसऱ्या भीषण अपघाताचा मोठा फटका बसला.माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. समोर वाहनांची स्पष्ट रांग दिसत असतानाही चालकाला ट्रक का थांबवता आला नाही, हा तपासातील कळीचा मुद्दा बनला आहे. ट्रक चालकाने मद्यप्राशन केले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.