दर ९ प्रौढांमागे १ व्यक्ती मधुमेहाच्या विळख्यात; जालना येथील तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा!

Jalna Nayak    13-Nov-2026
Total Views |
 
जागतिक मधुमेह दिन विशेष:
 
 
जागतिक मधुमेह दिन विशेष:
 
जालना/प्रतिनिधी : जगभरात दर ९ प्रौढ व्यक्तींमागे एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आजार बळावेपर्यंत अनेकदा याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणे आणि दृष्टी जाण्यासारखी गंभीर गुंतागुंत आधीच निर्माण झालेली असते. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या ‘मधुमेहावर लवकर कृती’ (Act Early on Diabetes) या यंदाच्या संकल्पनेचा आधार घेत, "मधुमेहाचे वेळेत निदान आणि आगामी १० वर्षांतील धोका ओळखून जीवनशैलीत बदल करणे हीच काळाची गरज आहे," असा परखड इशारा जालना येथील रुबी हॉस्पिटलचे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी दिला आहे.
 
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक मधुमेह दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील मधुमेहाच्या स्थितीवर प्रकाश टाकताना डॉ. सेठिया यांनी काही चिंताजनक आकडेवारी मांडली.  जगात आज दर ९ प्रौढांपैकी एकाला मधुमेह असून, सुमारे ६३ कोटी ५० लाख लोकांना याचा थेट धोका आहे. यातील २५ कोटींहून अधिक नागरिकांना आपल्याला हा आजार जडला आहे याची कल्पनाच नाही.वेळीच पावले न उचलल्यास २०५० पर्यंत हा आकडा तब्बल ८५ कोटींवर पोहोचण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
 
भारताची स्थिती: देशात सुमारे १०.५ टक्के प्रौढ लोकसंख्येला (म्हणजेच ८ कोटींहून अधिक जणांना) मधुमेह जडला आहे. याशिवाय, १३ ते २५ टक्के नागरिक 'प्री-डायबिटीस' (मधुमेहपूर्व अवस्था) या टप्प्यावर असून त्यांना पुढील पाच वर्षांत हा आजार होण्याचा उच्च धोका आहे.
तरुणाईत वाढता शिरकाव: पूर्वी हा आजार तिशी-चाळिशीनंतर किंवा वृद्धांमध्ये प्रामुख्याने आढळायचा. मात्र, बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावामुळे आता अवघ्या १५-१६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्येही उच्च रक्तदाब व मधुमेहाची लक्षणे दिसू लागली आहेत. जनुकीय जोखीम अधिक असल्यामुळे भारतीयांनी या बाबतीत अधिक सजग राहणे गरजेचे आहे.
 
मधुमेह: शरीराला हळूहळू पोखरणारा आजार
डॉ. सेठिया यांनी स्पष्ट केले की, मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेपुरता मर्यादित आजार नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर हळूहळू आघात करतो. जेव्हा मधुमेहाचे उशिरा निदान होते, तेव्हा ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये आधीच अंतर्गत गुंतागुंत निर्माण झालेली असते. याचा थेट परिणाम हृदय, मूत्रपिंड (किडनी), डोळे, मेंदू आणि नसांवर होतो.परंतु, सुरुवातीलाच 'अर्ली ॲक्शन' (लवकर कृती) घेतल्यास गंभीर आजार टाळता येतात, हृदयविकाराचा झटका किंवा अवयव निकामी होणे रोखता येते आणि रुग्णाचे आयुष्यमान वाढवता येते.
ही लक्षणे दिसल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका:वारंवार लघवी होणे आणि सतत तीव्र तहान लागणेनेहमीपेक्षा जास्त भूक लागणेविनाकारण वजन झपाट्याने कमी होणेसतत तीव्र थकवा व अशक्तपणा जाणवणेदृष्टी मंदावणे किंवा धूसर होणे.
 
प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी काय करावे?मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी किंवा तो नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉ. सेठिया यांनी खालील उपाय सुचवले आहेत:
संतुलित आहार: आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि फायबरयुक्त (तंतुमय) पदार्थांचा भरपूर समावेश करा. साखरयुक्त पेये, अतिगोड पदार्थ आणि तेलकट-जंक फूडचे सेवन टाळा.नियमित व्यायाम: दररोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे किंवा योगासने करणे फायदेशीर ठरते.वजन नियंत्रण: शरीराचा 'बीएमआय' (BMI) नियंत्रणात ठेवा.
 
वेळेवर वैद्यकीय सल्ला: मधुमेह असलेल्यांनी नियमित रक्तशर्करा तपासणी करावी, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत आणि उपचारांमध्ये स्वतःहून बदल करू नयेत.
 
'फाइंड-रिस्क' द्वारे जाणून घ्या पुढील १० वर्षांतील धोका!फाईंड रिस्क (Finnish Diabetes Risk Score - FINDRISC) हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य असलेले वैज्ञानिक डिजिटल रिस्क कॅल्क्युलेटर आहे. याद्वारे पुढील १० वर्षांत एखाद्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता किती टक्के आहे, याचे अचूक भाकीत केले जाते. यात वय, लिंग, बीएमआय, कंबरेचा घेर, शारीरिक हालचाली, आहार, उच्च रक्तदाबाची पार्श्वभूमी आणि कुटूंबातील मधुमेहाचा इतिहास या घटकांचे विश्लेषण करून गुण दिले जातात.या गुणांच्या आधारे संभाव्य धोका ओळखता येतो. स्कोअर जास्त आल्यास वेळेत आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला घेऊन मधुमेह टाळता येऊ शकतो. त्यादृष्टीने सौ. जमुनाबाई शिवरतन बगडिया चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रुबी हॉस्पिटलमध्ये दि. १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत विशेष तपासणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सेठिया यांनी दिली आहे.