भारतात सध्यातरी आखाती देशाप्रमाणे झिरो टॅक्स अशक्य; भविष्यात कदाचित शक्य
विशेष मुलाखत
सीए गोविंदप्रसाद मुंदडा, जालना
भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेत चार्टर्ड अकाउंटंट्सची (CA) भूमिका केवळ हिशोब तपासणीपुरती मर्यादित न राहता धोरणात्मक सल्लागार आणि देश उभारणीतील महत्त्वाचा घटक म्हणून पुढे येत आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, एआयचे आव्हान, बँकिंग क्षेत्रातील बदल आणि वाढत्या अपेक्षा या पार्श्वभूमीवर सीए क्षेत्राची सद्यस्थिती काय आहे? याच मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन मोठ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया , या रीजन मध्ये महारष्ट्र, गुजरात आणि गोवा असे तीन राज्य येतात. 'वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिल'चे (WIRC) अध्यक्ष सीए सौरभ अजमेरा यांची सीए गोविंदप्रसाद मुंदडा, जालना यांनी ही विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजमेरा यांनी सीएंसाठी उपलब्ध नव्या संधी, एआयचा प्रभाव, बँक ऑडिट पारदर्शकता, व्यापाऱ्यांचे कर नियोजन आणि भारताच्या आर्थिक भविष्याबाबत अत्यंत वस्तुनिष्ठ व रोखठोक मते मांडली आहेत.
🔸प्रश्न : अजमेराजी, 'डब्ल्यूआयआरसी' (WIRC) ही देशातील सर्वात मोठी कौन्सिल आहे. आपल्या देशात आणि बाहेर एकूण CA किती आहेत, त्यातील प्रॅक्टिस करणारे किती आणि विद्यार्थ्यांची संख्या किती आहे?
▪️सीए सौरभ अजमेरा : सध्या देशभरात आणि आयसीएआय अंतर्गत सुमारे ४,३०,००० सनदी लेखापाल कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे १,६०,००० सीए हे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचा समावेश असलेल्या वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिलमध्ये येतात. यातील जवळपास ४५,००० सीए प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये आहेत. राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर एकूण सीएंपैकी साधारण ३५% सदस्य सध्या स्वतंत्र व्यावसायिक प्रॅक्टिसमध्ये सेवा देत आहेत.
🔸प्रश्न : देशात दिवसेंदिवस सीएंची संख्या वाढते आहे, पण कामाच्या संधी त्या प्रमाणात वाढत नाहीत, असा एक सर्वसाधारण समज आहे. याबद्दल आपले मत काय? [
▪️सीए सौरभ अजमेरा : हा केवळ एक गैरसमज आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, जितकी सीएंची संख्या वाढली आहे, त्याहून अधिक प्रमाणात रिक्त पदे वाढली आहेत. आमच्या नुकत्याच झालेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये नोकऱ्यांची मागणी खूप मोठी होती आणि तुलनेने अर्जदार कमी होते. आज कॅपिटल मार्केट, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर, इक्विटी रिसर्च, एफपी अँड ए या सर्वच क्षेत्रांत सीएंना प्रचंड मागणी आणि चांगले पॅकेज मिळत आहे. प्रॅक्टिसमध्येही आयपीओ मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी आणि फॉरेन्सिक यांसारखी नवी दालने खुली झाली आहेत. त्यामुळे कामाच्या संधींमध्ये कोणतीही घट झालेली नाही.
🔸प्रश्न : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे भविष्यात सीए क्षेत्रासाठी वरदान ठरेल की धोका?
▪️सीए सौरभ अजमेरा : माझ्या मते एआय हे आपल्यासाठी वरदान (ब्लेसिंग) आहे. सीएचे काम केवळ डेटा गोळा करणे नसून, त्या डेटाचे विश्लेषण करणे हे आहे. एआयच्या माध्यमातून डेटा तयार करणे किंवा सादरीकरण करणे अधिक सोपे व गतिमान होते. एआयने दिलेल्या माहितीवर स्वतःची बुद्धिमत्ता आणि विश्लेषण जोडून आपण क्लायंटला अधिक प्रभावी 'व्हॅल्यू ॲडिशन' देऊ शकतो.
🔸प्रश्न : पूर्वी राष्ट्रीयीकृत बँका ऑडिटसाठी सीएंच्या मागे लागत होत्या, मात्र आज बँक ऑडिट वाटपासाठी (Bank Audit Allotment) सीए लोकांना बँकांचे उंबरे झिजवावे लागतात, याचे कारण काय?
▪️सीए सौरभ अजमेरा : याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत अनेक सार्वजनिक आणि शेड्युल बँकांचे विलीनीकरण झाले आहे. तसेच ऑडिटच्या कक्षेतील ॲडव्हान्सेसची मर्यादा बदलली आहे. बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे एकूण शाखा व ऑडिटच्या जागा कमी झाल्या, तर दुसरीकडे सीएंची संख्या वाढली. यामुळे अलॉटमेंट मिळणे पूर्वीसारखे सहज राहिलेले नाही.
🔸प्रश्न : बँक ऑडिट अलॉटमेंटसाठी बँकांमध्ये आर्थिक व्यवहार होतात, अशा दबक्या आवाजात चर्चा असतात. याबाबत आपल्याकडे काही लेखी तक्रारी आल्या आहेत का?
▪️सीए सौरभ अजमेरा : या निव्वळ अफवा असून यात कोणतेही तथ्य नाही. आजतागायत अशी कोणतीही लेखी तक्रार आमच्याकडे आलेली नाही. सीए प्रोफेशन हे पारदर्शकतेचे प्रतीक आहे. ऑडिटची संख्या कमी असल्याने अशा अफवा पसरवल्या जातात. तरीही ही प्रणाली १००% पारदर्शक राहावी यासाठी वैयक्तिक बँकांऐवजी आरबीआयच्या माध्यमातून सॉफ्टवेअरद्वारे थेट ऑडिट अलॉटमेंट व्हावे, असा आमचा पाठपुरावा सुरू आहे. अनेक बँकांनी आता सॉफ्टवेअर प्रणाली स्वीकारली आहे.
🔸प्रश्न : इतर व्यवसायांच्या तुलनेत सीएंच्या स्वातंत्र्यावर आणि मार्केटिंगवर बरीच बंधने आहेत, ही बंधने शिथिल व्हावीत का?
▪️सीए सीए सौरभ अजमेरा : संस्थेने (ICAI) जुन्या आचारसंहितेमध्ये (Code of Conduct) सुधारणा करून नवीन नियमावलीत अनेक गोष्टी उदार केल्या आहेत. आता सीए व्यावसायिक पद्धतीने
डिजिटल माध्यमांवर माहिती मांडू शकतात. मात्र सीए प्रोफेशनचे एक वेगळे सामाजिक वजन आणि मूल्य आहे. रस्त्यावर किंवा पत्रके वाटून मार्केटिंग करणे या व्यवसायाच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. त्यामुळे प्रतिष्ठेला बाधा न पोहोचू देता व्यावसायिक मार्केटिंगला आता पुरेशी मोकळीक देण्यात आली आहे.
🔸प्रश्न : कोणत्याही आर्थिक घोटाळ्यात सरकार किंवा तपास यंत्रणा थेट सीएला जबाबदार धरतात, हा मवाळ दृष्टिकोन (सॉफ्ट कॉर्नर) कितपत योग्य आहे?
▪️सीए सौरभ अजमेरा : सीएकडे कंपनीचा किंवा संस्थेचा डेटा असतो, पण याचा अर्थ ते गैरव्यवहारात सहभागी आहेत असा मुळीच होत नाही. थेट सीएला लक्ष्य करणे चुकीचे आहे. खरा सूत्रधार किंवा अंतिम लाभार्थी कोण आहे, हे तपासणे गरजेचे आहे. सीएचा प्रत्यक्ष गैरव्यवहारात सहभाग आहे की नाही याची निष्पक्ष चौकशी न करता केवळ त्यांच्याकडे डेटा आहे म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अन्यायकारक आहे.
🔸प्रश्न : जागतिक मंदी आणि युद्धाच्या सावटाखाली भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारला काय सूचना द्याल?
▪️सीए सौरभ अजमेरा :
१. भारताला 'ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब' बनवण्यासाठी उत्पादनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले पाहिजे.
२. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या एमएसएमई उद्योगांना खेळते भांडवल सुलभरीत्या मिळायला हवे.
३. शेअर बाजारात आणि कॅपिटल मार्केटमध्ये तरलता (Liquidity) टिकवून ठेवण्यासाठी लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स किंवा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये सरकारने सवलत देण्याचा गांभीर्याने विचार करावा.
🔸प्रश्न : ३६५ दिवसांच्या कार्यकाळात आज तुमचा २५१ वा दिवस असून आपण तब्बल २८० हून अधिक उपक्रम राबवले, या कार्यक्षमतेचे रहस्य काय?
▪️सीए सौरभ अजमेरा : योग्य नियोजन आणि वेळेचा सदुपयोग हेच याचे रहस्य आहे. गेल्या सहा वर्षांचा कौन्सिलमधील अनुभव लक्षात घेऊन मी प्रत्येक दिवसाचे काटेकोर नियोजन केले. प्रत्येक दिवस हा सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समर्पित भावनेने दिला, त्यामुळेच २५१ दिवसांत २८० पेक्षा जास्त यशस्वी कार्यक्रम आम्ही पूर्ण करू शकलो.
🔸प्रश्न : आखाती देशांप्रमाणे भारतातही 'झिरो टॅक्स' प्रणाली शक्य आहे का?
▪️सीए सौरभ अजमेरा : सध्याच्या परिस्थितीत भारतात 'झिरो टॅक्स' अशक्य आहे. आखाती देशांची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या आणि मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती वेगळी आहे. भारतात प्रचंड लोकसंख्या, कल्याणकारी योजना, शेतकरी-युवकांचे हित आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारला मोठ्या महसुलाची गरज असते. भविष्यात भारत पूर्ण विकसित देश होऊन आपली निर्यात मोठ्या प्रमाणावर सरप्लस झाली, तरच करांमध्ये काही प्रमाणात मोठ्या सवलतींची अपेक्षा करता येईल.
🔸प्रश्न : WIRC चे न्यूज लेटर हार्ड कॉपीमध्ये दिले जात नाही. किमान वरिष्ठ सीएना तरी देण्यात यावे, अशी वरिष्ठांची मागणी आहे.
▪️सीए सौरभ अजमेरा : ज्यांना पाहिजे त्यांनी आम्हाला ई-मेल पाठवावे, याचाही विचार करू.
🔸प्रश्न : करदाते आणि विशेषतः व्यापारी वर्गाला तुमचा काय सल्ला असेल?
▪️सीए सौरभ अजमेरा : व्यापाऱ्यांनी करचोरीचा मार्ग न निवडता डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभागी होऊन योग्य कर भरला पाहिजे. आपली बॅलन्स शीट जितकी स्वच्छ, पारदर्शक आणि भक्कम असेल, तितके भविष्यात कंपनीचे व्हॅल्यूएशन कित्येक पटीने वाढते. आज आयपीओ किंवा इक्विटी फंडिंग मिळवण्यासाठी तुमचा आर्थिक ट्रॅक रेकॉर्ड मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे.
🔸प्रश्न : पश्चिम विभागातील (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) सीए साठी काय संदेश द्याल आणि आगामी उपक्रम कोणते आहेत?
▪️सीए सौरभ अजमेरा : आपल्या सर्वांचे अंतिम ध्येय 'विकसित भारत' घडवणे हे असले पाहिजे. यासाठी सीए फर्म्सनी एकमेकांशी समन्वय साधून मोठ्या बहुराष्ट्रीय संस्था उभ्या केल्या पाहिजेत. आगामी काळात मुंबईत दोन ऐतिहासिक कार्यक्रम होत आहेत.
४० वी प्रादेशिक परिषद : ४ व ५ डिसेंबर रोजी जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये संपन्न होईल; यात ३,००० पेक्षा जास्त सीए, १०० पेक्षा अधिक वक्ते सहभागी होतील.
सीए विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय परिषद: जिओ सेंटर येथे प्रथमच विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे ही शेवटी आवाहन केले.